उत्तर प्रदेशात चौकीदाराची वाटचाल खडतर

Mumbai
Uttar Pradesh

देशाच्या राजमुकुटापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. कारण या एकट्या राज्यात देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. तर राज्यसभेच्या ७१ जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या राज्यात काँग्रेस, भाजप हे राष्ट्रीय पक्ष आणि सप आणि बसप हे प्रादेशिक पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. मागील १९५१ पासून काँग्रेसने या ठिकाणी सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. मधल्या काळात भाजपने मुसंडी मारली होती. त्यानंतर जनता दल, समाजवादी पक्ष मोठा पक्ष बनला होता. २०१४ च्या १६ व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात देशभर नाराजीचे वातावरण पसरले होते. तब्बल १५ वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसची कारकीर्द डागाळलेली होती. त्याचा फायदा घेत भाजपने देशभर काँग्रेसविरोधात वातावरणनिर्मिती केली. मणिशंकर अय्यर यांनी ‘२१व्या दशकात नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनूच शकणार नाही, इथे येऊन जर त्यांना चहाच विकायचा असेल तर आम्ही त्यांना त्यासाठी जागा देऊ’, असे विधान केले होते. भाजपने नेमके याच वक्तव्याचा फायदा उठवत देशभर ‘चाय पे चर्चा’, ‘नमो टी स्टॉल’ मोहीम सुरू केली. देशातील ५०० शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने मोदींच्या नावाने चहाचे स्टॉल उघडण्यात आले. एखाद्या टिकेचा फायदा कसा करून घ्यायचा, हे भाजपकडून शिकावे. अशा प्रकारे देशभरात काँग्रेसविरोधी वातावरण बनवून भाजपने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सर्वत्र नरेंद्र मोदी यांची लाट निर्माण केली. त्या लाटेत भाजपने काँग्रेसचा सुपडासाफ केला. त्यासोबत उत्तर प्रदेशातील सप आणि बसप या बलाढ्य प्रादेशिक पक्षांनाही जोरदार फटका दिला. भाजपने या राज्यात ८० पैकी ७३ जागा जिंकल्या. १९८४ मध्ये स्व. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर सहानुभूतीपोटी काँगे्रस या राज्यात ८५ पैकी ८३ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर प्रथमच अगदी त्याच तोलामोलाचा विजय भाजपला २०१४ मध्ये उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत मिळाला. मात्र २०१९ची लोकसभा निवडणूक भाजपला खडतर आहे.

२०१९ या १७व्या लोकसभा निवडणुकीत २०१४ची पुनरावृत्ती होऊ नये, याकरता उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या बलाढ्य प्रादेशिक पक्षांनी आपापले मतभेद विसरून प्रथमच एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या समोर यावेळी विरोधी शक्ती एकवटलेली आहे. उत्तर प्रदेशात दलित आणि मुस्लीम मतांची शक्ती या दोन प्रादेशिक पक्षांच्या मागे उभी आहे. या राज्यातील एकूण मतदारांपैकी ४० टक्के भाग हा दलित, मुस्लीम मतदारांनी व्यापलेला आहे. त्यांच्यासोबत बहुजन मतदारांची जोड मिळाली तर ही मते निर्णायक ठरतात. २०१४ मध्ये हे दोन्ही प्रादेशिक राजकीय पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे या मतांमध्ये विभागणी झाली होती, परंतु २०१९मध्ये सप आणि बसप हे एकत्र निवडणूक लढवत असल्याने या मतांमध्ये विभाजन होणार नसल्याने त्याचा भाजपला थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील अस्तित्व १९८४पासून घटत गेले. एकेकाळी लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील सर्वाधिक जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष २०१४मध्ये अवघ्या २ जागांवर येऊन ठेपला. मात्र देशाचे सत्ताकेंद्र काबीज करायचे असेल, तर उत्तर प्रदेशाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे काँग्रेस जाणून असल्याने काँग्रेसने यंदा हुकमी एक्का म्हणून प्रियांका गांधी यांचा राज्याभिषेक केला. त्यांना उत्तर प्रदेशाची लोकसभा निवडणुकीची सर्व जबाबदारी देऊन काँग्रेसने इंदिरा गांधींची छबी जनसामान्यांसमोर उभी करण्याचा बर्‍यापैकी यशस्वी प्रयत्न केला आहे. सध्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील गल्लीबोळात फिरून जनसामान्यांना विश्वासात घेत आहेत. यानिमित्ताने काँग्रेसलाही उभारी मिळत असल्याचे चित्र आहे. परंतु समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी काँग्रेसला त्यांच्या तिसर्‍या आघाडीत समावून घेतले नसल्याने काँग्रेसलादेखील ही निवडणूक अवघडच जाणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचा मतदार आणि सप आणि बसप यांचा मतदार एकच असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत किती बळ प्राप्त होईल, याविषयी साशंकता आहे. मात्र यानिमित्ताने काँग्रेसने अनेक वर्षांनंतर उत्तर प्रदेशात पक्ष बांधणीला सुरूवात केली, हीच जमेची बाजू आहे.

‘चौकदार’ही केला इनकॅश
२०१४मध्ये मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांना चायवाला म्हणून हिणवल्यानंतर भाजपने त्याचा नियोजनबद्धपणे फायदा घेत देशभर ‘चाय पे चर्चा’ मोहीम सुरू केली. आता २०१९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ‘चोकीदार चोर है’, अशी टॅगलाइन घेत देशभर भाजपविरोधी प्रचार सुरू केला आहे. राहुल गांधी प्रत्येक भाषणात याचा वापर करतात, आता तर ते केवळ ‘चौकीदार…’ असाच शब्द उच्चारतात, त्यानंतर पुढे बसलेला जनसमुदाय ‘…चोर है’, असे म्हणतात. या टिकेचेही इनकॅश करत भाजपने ‘मै भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. त्याला कोेट्यवधीच्या संख्येने ट्वीटर फॉलोअर्स मिळत असल्याने काँग्र्रेसची गोची झाली आहे. भाजपने अशी टॅगलाइन करत राहुल गांधी यांच्या टिकेचेही इनकॅश केले आहे. अशा प्रकारे महागाई, बेकारी, शेतकर्‍यांचा प्रश्न, जीएसटी इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर भाजपने सर्वसामान्यांचे लक्ष हटवण्यात यश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यात भाजपला यश मिळेल का, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

५८ वर्षांपासूनचा लोकसभा निवडणुकीचा इतिहास
उत्तर प्रदेशात १९५१ पासून १९८४ पर्यंत काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. १९८४मध्ये तर स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे काँग्रेस पक्षाला मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसने एकूण ८५ जागांपैकी तब्बल ८२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर मात्र काँग्रेसला उत्तर प्रदेशात उतरती कळा लागली. १९८९मध्ये जनता दलाला सर्वाधिक ५४ जागा मिळाल्या. पुढे १९९१ ते १९९९ पर्यंत भाजपने लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या. २००४ आणि २००९ या लोकसभा टर्ममध्ये समाजवादी पक्षाने लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या. 2014 मध्ये १६व्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने मुसंडी मारली आणि एकूण ८० जागांपैकी ७३ जागा जिंकल्या. तर समाजवादी पक्षाने ५, काँग्रेसने २, बहुजन समाज पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here