घरलोकसभा २०१९वंचितची विधानसभेच्या दिशेने घोडदौड

वंचितची विधानसभेच्या दिशेने घोडदौड

Subscribe

लोकसभा निवडणुकीतून राज्यात काही नवी राजकीय समीकरणे उदयास आली आहेत. निवडणूक काळात सेना-भाजप आणि दोन्ही काँग्रेस या प्रस्तापित पक्षांच्या चर्चेत अचानक वंचित बहुजन आघाडीचीही चर्चा सुरू झाली. सुरुवातीला भाजप-सेनेच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत म्हणून ही नवीन आघाडी असू शकते, अशी चर्चा होती. लोकसभेत सेना-भाजप युतीच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होईल, अशी शक्यता वाटली होती, परंतु घडले उलटेच. प्रकाश आंबेडकर यांनी ४८ पैकी वंचितला १२ जागा सोडण्याचा अट्टाहास धरला, त्याला काँग्रेसने साफ नकार दिला. अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सर्वच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार उमेदवारांची यादी जाहीर केली. तत्पूर्वी काँग्रेस या आघाडीची ताकद नसतानाही ६ जागा सोडण्यास तयार झाली होती. यावरून प्रकाश आंबेडकर यांना मुळात काँग्रेससोबत जायचेच नव्हते, त्यांना स्वबळावरच निवडणूक लढवायची होती. त्याकरता त्यांनी एमआयएमसोबतही हातमिळवणी केली. ज्यामुळे बाराबलुतेदारांसह प्रकाश आंबेडकरांकडे एक गठ्ठा मुस्लिम मते आपसूक आली होती. त्यायोगे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वंचित बहुजन आघाडी ताकदवान दिसू लागली.

निवडणूक प्रचारात वंचितच्या सभा सुरू झाल्या. एमआयएमचे असुद्दीन औवेसी आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे मिळून सेना-भाजपबरोबर दोन्ही काँग्रेसवर टिका करत राहिले. निवडणूक पार पडली, निकाल जाहीर झाले आणि मतसंख्येवर नजर मारल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमागील राजकीय खेळी नक्की काय होती, याचा प्रत्यय आला. वंचित आघाडीने ४८ मतदारसंघात ४३ लाख ३२ हजार मते मिळवली, ही सरासरी ७-८ टक्के मते आहेत. तसेच ४८ पैकी काँग्रेसच्या ९ जागा वंचितमुळे प्रभावित झाल्या. ज्यात बीड, बुलडाणा, गडचिरोली-चिमूर, नांदेड, परभणी, सोलापूर आणि यवतमाळ या मतदारसंघाचा सामवेश आहे. वंचितमुळे सेना-भाजपचेही मताधिक्क्य काही प्रमाणात घटले, अगदी औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला, तेथे वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील निवडून आले.

- Advertisement -

एकूणच काय तर प्रकाश आंबेडकर यांचा लोकसभा निवडणूक लढवताना ‘ही निवडणूक जिंकायचीच’, असा मुळीच हेतू नव्हता, तर या निवडणुकीत स्वत:ची वोट बँक निर्माण करून विधानसभा गाजवायची असा त्यांचा मुख्य उद्देश होता, म्हणून प्रकाश आंबेडकरांसाठी लोकसभा ही विधानसभेसाठी लिटमस टेस्ट होती, ज्यात ते यशस्वी झाले. कारण ४८ जागांपैकी ९० टक्के मतदारसंघात वंचित आघाडी तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यात काही ठिकाणी लाखाच्या घरात तर काही ठिकाणी लाखाच्या आसपास मते या आघाडीने मिळवली आहेत. अशा प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची स्वत:ची वेगळी वोट बँक तयार केली आहे.

२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याचे दिसून आले. २०१४च्या विधानसभेतही दोन्ही काँग्रेसची ताकद कमी झालेली होती, २०१९च्या विधानसभेतही दोन्ही काँग्रेसची अशीच परिस्थिती असणार आहे. यात काँग्रेसची तर अगदीच दयनीय स्थिती असणार आहे. अशा वेळी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची नेमकी संधी साधण्यासाठी प्रकाश आंबेडकर अक्षरश: उतावीळ झालेले आहेत. यानिमित्ताने इथे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी सेनेच्याच विचारधारेला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि २००९च्या विधानसभेत शिवसेनेच्या वाट्याच्या १३ जागा हिसकावून दमदार मजल मारली होती. प्रकाश आंबेडकर यांचीही घौडदौड काहीशी याच दिशेने सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मते फोडून त्यांनी स्वत:ची वोट बँक लोकसभा निवडणुकीत तयार केलेली आहे. त्याआधारे ते विधानसभेला सामोरे जातील, तेव्हा मनसेप्रमाणे विधानसभेत अनपेक्षित यश मिळवतील, मात्र त्यांचा हा प्रयोग किती काळ टिकतो की मनसेप्रमाणे फोल ठरतो, हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -