बडनेरा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३७

अमरावती जिल्ह्यात बडनेरा (विधानसभा क्र. ३७) विधानसभा मतदारसंघ आहे.

Amravati
badnera assembly constituency
बडनेरा विधानसभा मतदारसंघ

बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक शहर आहे. आमरावती जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सर्वात पहिला मतदारसंघ म्हणजे बडनेरा मतदारसंघ. या मतदारसंघाचा ३७ वा क्रमांक लागतो. १९६२ साली या मतदारसंघाची स्थापना झाली. काँग्रेसचे पुरुषोत्तम देशमुख हे या मतदारसंघात निवडूण येणारे पहिले आमदार आहेत. त्यानंतर १९६७ साली आरपीआयचे के. बी. श्रृंगारे निवडूण आले होते. त्यानंतर आरपीआयचा एकही उमेदवार या मतदारसंघातून निवडूण आलेला नाही. या मतदारसंघात सर्वांधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. त्याखालोखाल शिवसेनेला सत्तेत राहता आलेले आहे. काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघात सहा वेळा निवडून आले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार तीन वेळा निवडून आले आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा हे या मतदारसंघात निवडून येणारे पहिले अपक्ष उमेदवार ठरले होते. ऐवढेच नाही तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही रवी राणा यांचा विजय झाला.

मतदारसंघ क्रमांक – ३७

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – ९४,९२३
महिला – ८२,५७३
एकूण मतदार – १,७६,६५५

विद्यमान आमदार – रवी गंगाधर राणा, अपक्ष

बडनेरा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून येणारे रवी राणा हे पहिले उमेदवार ठरले आहेत. २००९ साली त्यांनी सर्वात पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. चांगले संघटन कौशल्य, समाजभान, सामाजिक कार्याची आवड या कलागुणांच्या पार्श्वभूमीवर बडनेरा मतदारसंघातील जनतेने २०१४ साली देखील रवी राणा यांच्यावर विश्वास ठेवला आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. रवी राणा हे तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत. अमरावतीमधील युवा स्वाभिमान संघटनेचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. रवी राणा २०१३ साली प्रसिद्धीच्या झोतात आले होते. कारण २०१३ मध्ये त्यांनी ३७७० सामूहिक विवाहांची एकाच दिवशी आयोजन केले होते. त्यामुळे या सामूहिक विवाहाची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी सिनेअभिनेत्री नवनीत राणा यांच्यासोबत विवाह केला होता. सध्या नवनीत राणा या लोकसभेच्या सदस्य आहेत.

ravi rana
बडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) रवी गंगाधर राणा, अपक्ष – ४६,८२७
२) संजय बंड, शिवसेना – ३९,४०८
३) श्रीमती सुलभा खोडके, काँग्रेस – ३३, ८९७
४) तुषार भारतीय, भाजप – ३१,४५५
५) रवी वैद्य, बहुजन समाज पक्ष – १२,६६३

हेही वाचा – अमरावती लोकसभा मतदारसंघ