गंगाखेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९७

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड (विधानसभा क्र. ९७) विधानसभा मतदारसंघ आहे.

gangakhed assembly constituency
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९७

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. गोदावरी नदीचा सुपीक वारसा लाभलेला असा हा मतदारसंघ आहे. २००९ च्या आधी गंगाखेड हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता. मात्र २००९ साली तो सर्वसाधारण गटासाठी खुला करण्यात आला. १९९५ पर्यंत येथे शेकापचे उमेदवार चार वेळा निवडून आले होते. त्यानंतर १९९५ साली अभ्युदय बँकेचे चेअरमन सीताराम घनदाट यांनी शेकापकडून ही जागा खेचून आणत अपक्ष म्हणून निवडून आले.

२००४ साली विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे हे भाजपात होते. त्यांनी विठ्ठल गायकवाड यांना त्यावेळी निवडून आणले. मात्र २००९ साली पुन्हा एकदा सीताराम घनदाट अपक्ष म्हणून निवडून आले. गंगाखेडच्या या राजकारणात मतदारसंघाचा विकास मागे राहिला. २०१४ च्या निवडणुकीत तर गंगाखेडच्या मतदारांना विकासाच्या आश्वासनाऐवजी लक्ष्मी दर्शनच झाले. रत्नाकर गुट्टे, मधुसूदन केंद्र आणि सीताराम घनदाट यांच्या रुपाने तीन श्रीमंत उमेदवार निवडणुकीला उभे होते. याच निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी घनदाट यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींचे बोगस कर्ज उचलले होते. या प्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात गुट्टे आणि केंद्रे यांचा संघर्ष बराच काळ रंगला. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत काय होणार? गुट्टे स्वतः निवडणूक लढविणार की त्यांच्या कुटुंबातून कुणी पुढे येणार? घनदाट यांची यावेळी काय भूमिका असणार? अशा बऱ्याच शक्यतांनी याही वेळेची निवडणूक रंगतदार होणार, हे नक्की.

मतदारसंघ क्रमांक – ९७

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,९०,६२६
महिला – १,७४,४८९
एकूण मतदान – ३,६५,११५

विद्यमान आमदार – डॉ. मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस

डॉ. मधुसूदन केंद्रे हे २०११ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्याआधी ते भाजपमध्ये होते. केंद्रे हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे मेव्हणे आहेत. मुंडे राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. २००९ साली केंद्रे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र सीताराम घनदाट यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून २०१४ साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदारकी मिळवली.

Gangakhed MLA Dr Madhusudan kendre
गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादी – ५८,४१५
२) रत्नाकर गुट्टे, रासप – ५६,१२६
३) सीताराम घनदाट, अपक्ष – ४७,७१४
४) डॉ. शिवाजी दळणर, शिवसेना – ४१,९१५
५) बाळासाहेब देसाई, मनसे – १७,८१६


हे वाचा – परभणी लोकसभा मतदारसंघ