मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. : ११५

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य(विधानसभा क्र. ११५) विधानसभा मतदारसंघ आहे.

Nashik

नाशिक  जिल्ह्यातील मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मालेगाव बाह्य या मतदारसंघात मालेगाव शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव नववसाहत, द्याने, कलेक्‍टरपट्टा या शहरी भागासह ग्रामीण भागातील ७६ गावांचा समावेश या मतदारसंघात करण्यात आला. या मतदारसंघात मराठा समाजा पाठोपाठ माळी समाज असून दलित व आदिवासी मतदार आहेत. सर्वच समाजाचा या मतदारसंघात समावेश आहे.

२००९ च्या निवडणुकीत मालेगाव तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट असलेली काही गावे नांदगाव मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली. तिकडे पंकज भुजबळ यांची उमेदवारी असल्याने छगन भुजबळ यांचा मालेगावशी संबंध वाढला, भुसे यांनी भुजबळांची जवळीक वाढवली. याचाच फायदा घेत भुसे यांनी विजय मिळविला.
या निवडणुकीचा पराभव विरोधात असलेल्या हिरेंच्या इतका जिव्हारी लागला की, हिरे यांनी राजकीय संन्यास घेत आपला मुक्काम नाशिक येथे हलविला. तिकडे त्यांचे मोठे पुत्र नगरसेवक नंतर शिक्षक आमदारही झाले. इकडे मात्र अद्वय एकटेच भुसेंच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. या दरम्यान बाजारसमिती, शेतकरी सहकारी संघ यांच्यावर सत्ता प्रस्थापित केली. स्वत: जिल्हा बॅंकेचे तसेच जिल्हा शेतकरी संघाचे अध्यक्षपद मिळविण्यात यशस्वी ठरले. आपल्या अतिशय रांगड्या वक्तव्यांनी ते कायम चर्चेत असतात. नुकताच त्यांनी भाजपातून स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मतदारसंघ क्रमांक : ११५

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या

पुरुष : १,७८,५५४
महिला : १,६०,५१४
तृतीयपंथी : ३
एकूण : ३,३९,०७१

विद्यमान आमदार- दादाजी भुसे, शिवसेना

मंत्रिमंडळात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या दादा भुसे २०१४ यांनी २०१४च्या निवडणुकीत विरोधकांना पराभवाची धूळ चाखत आपला विजय निश्चित केला. या निवडणुकीत भुसेंविरोधात अद्वय हिरे यांनी त्यांचे निकटवर्तीय पवन ठाकरे यांना भाजपाकडून उमेदवारी दिली. तर मुळचे भाजपाचे असलेले सुनिल गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून नशीब आजमावले. काॅंग्रेसकडून डॉ राजेंद्र ठाकरे उमेदवार होते. मोदी यांचा बोलबाला भाजपामय वातावरणही या मतदारसंघात प्रभाव टाकू शकले नाही. मात्र, प्रमुख पक्षांच्या मतांच्या बेरीजेपेक्षा भुसे यांचा लिड होता.

तत्पूर्वी २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना हिरे घराण्याचा पारंपारिक वर्चस्व असलेल्या मतदारसंघात परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे यांचा दादा भुसे यांनी पराभव करत ‘जायंट किलर’ ठरले होते. मतदारसंघ हा त्यावेळी भाजपाच्या ताब्यात होता, त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक भुसे यांना लढवावी लागली होती. आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी निर्धास्त न राहता ग्रामिण भागात संपर्क वाढवला. हिरे घराण्याचा ग्रामिण भागात मोठा दबदबा होता, मात्र भुसे यांच्या झंझावाताने अनेक ग्रामपंचायती व विविध कार्यकारी सोसायटींवर भगवा फडकला.
२००९ च्या निवडणुकीतही प्रशांत हिरे आणि दादा भुसे यांचाच सामना उभा ठाकला. फक्त यावेळी भुसे यांनी भाजपाकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे मिळवून घेतला. मात्र, आधीचा दाभाडी मतदारसंघाचे नाव बदलून मालेगाव बाह्य झाले आणि रचनाही बदलली.

येत्या निवडणुकीत काॅग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी जोरदारपणे तालुक्यात संपर्क अभियान सुरू केले आहे. राष्ट्रवादी कडून अद्वय हिरे, राजेंद्र भोसले यांची नावे चर्चेत आहेत. तर वंचित आघाडीकडून भारत म्हसदे इच्छुक आहेत. भाजपा शिवसेना युती झाली नाही तर भाजपाकडून जिल्हाध्यक्ष दादा जाधव, सुनिल गायकवाड, लकी गिल, निलेश कचवे यांचेसह चौदा जण बाशिंग बांधून बसले आहेत.
मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाटेला आलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचाच पण सर्वमान्य असा उमेदवार दिला जाईल. यात सर्वात उंचावर राजेंद्र भोसले यांचे नाव घेण्यात येते. भोसले जिल्हा बॅंकेचे, जिल्हा मजूर संघाचे, मालेगाव मर्चंस्ट्स बॅंकेचे चेअरमन राहिलेले आहेत, त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात त्यांचा संपर्क चांगलाच आहे, शिवाय त्यांची ओळख अजातशत्रू अशी आहे. त्यामुळे कदाचित या मतदारसंघात भुसे विरुद्ध भोसले असा सामना पहायला मिळेल.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ आमदार दादा भुसे

विधानसभा निवडणुक २०१४ परिस्थिती

दादाजी भुसे – शिवसेना – ८२०९३
पवन ठाकरे – भाजपा – ४४६७२
सुनिल गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस – २८३००
डॉ राजेंद्र ठाकरे – काॅंग्रेस – ४०९४


हे ही वाचा –  धुळे लोकसभा मतदारसंघ