परभणी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९६

परभणी जिल्ह्यातील परभणी (विधानसभा क्र. ९६) विधानसभा मतदारसंघ आहे.

parbhani south assembly constituency
परभणी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९६

परभणी जिल्ह्यातील परभणी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. एकेकाळी शेकापचा गड असलेला हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९७२ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या रावसाहेब जामकरांनी इथे विजय मिळवला होता. त्यानंतर १९८० साली काँग्रेसचेच अब्दुल रहमान खान यांनी विजय मिळवला. १९८५ साली पुन्हा शेकापच्यावतीने विजय गव्हाणे यांनी विजय मिळवला होता. मात्र १९९० पासून शिवसेनेने सातत्याने आपले वर्चस्व या मतदारसंघावर राखले आहे.

परभणी मतदारसंघात मराठा आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असल्यामुळे १९९० पासून इथे शिवसेनेचे हिंदू आमदार निवडून येत आहेत. २०१४ साली सर्व पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवूनही शिवसेनेने आपला गड कायम राखला होता. एमआयएमने देखील शिवसेनेला कडवी झुंज दिली होती. तर भाजपच्या आनंद भरोसे यांनी ४२ हजार मते घेऊन आश्चर्याचा धक्का दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मात्र २०१४ निवडणुकीत अक्षरशः पाणीपत झाले.

मतदारसंघ क्रमांक – ९६

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४६,४४९
महिला – १,३१,९२८
एकूण मतदान – २,७८,३७७

विद्यमान आमदार – डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील, शिवसेना

आमदार राहुल पाटील हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेले. याआधी त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. दहिहंडी आणि गणेशोत्सव समितीच्या माध्यमातू त्यांनी आपला जनसंपर्क वाढविला. परभणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात त्यांनी शिक्षण संस्थाचे जाळे विणले आहे.

राहुल पाटील यांनी जरी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी २०१९ ला काय होईल हे सांगता येत नाही. परभणी लोकसभेचे खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय जाधव यांच्यासोबत त्यांचे जराही जमत नाही. दोन्ही नेते एकाच पक्षाचे असून देखील एकाच व्यासपीठावर येणे टाळतात. त्याचबरोबर भाजपचे आनंद भरोसे यांनी २०१४ च्या निवडणुकीत आश्चर्यकारक मते घेऊन या मतदारसंघावर भाजपचा दावा सांगायला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती असली तर परभणीत मात्र सेना आणि भाजपमध्ये सख्य नाही. भाजपने जर हा मतदारसंघ शिवसेनेकडून मिळवला तर डॉ. राहूल पाटील यांच्यासाठी आमदार होणे कठिण होऊन बसेल.

Shiv Sena MLA Dr Rahul Patil
आमदार डॉ. राहूल पाटील

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. राहूल पाटील, शिवसेना – ७१,५८४
२) सयैद खालीद, एमआयएम – ४५,०५८
३) आनंदराव भरोसे, भाजप – ४२,०५१
४) प्रताप देशमुख, राष्ट्रवादी – ११,३७५
५) इरफान उर रहमान खान, काँग्रेस – ७,३४२


हे वाचा – परभणी लोकसभा मतदारसंघ