संगमनेरात गावठी कट्टयासह ३८ काडतुसे पोलिसांनी पकडली

Sangamner

प्रतिनिधी, संगमनेर

गेल्या आठवड्यामध्ये सोनाराकडील दागिने लंपास करताना हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेत हल्लेखोरांनी गावठी कट्ट्याचा वापर केल्यानंतर सतर्क झालेल्या संगमनेर शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री नाशिक-पुणे महामार्गावर केलेल्या कारवाईत तिघा आरोपींकडून गावठी कट्ट्यासह ३८ काडतुसे हस्तगत केली. या कारवाईत पोलिसांनी स्कार्पिओसह सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना अटक केली.
काही संशयित गावठी कट्टा घेऊन संगमनेर मार्गे जात असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली होती. निरीक्षक अभय परमार यांनी याची माहिती वरिष्ठांना देत गुरुवारी मध्यरात्री नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या टोल नाक्यानजीक सापळा लावला. आरोपींकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती असतानादेखील पोलिसांनी संशयीत लाल रंगाची स्कार्पिओ तपासणीच्या नावाखाली बाजूला घेतली. संशयित आरोपींकडे घातक शस्त्रे असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याकडील सर्विस रिव्हाल्वर वाहनातील संशयितांवर रोखत त्यांना गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले.
त्यांनी आरोपींकडे चौकशी केली असता दिलीप कोंडीबा खाडे (वय 28), बाबाजी बबन गुंजाळ (वय 27) आणि दयानंद मारुती तेलंग (वय 33 सर्व राहणार शिरूर, जिल्हा पुणे) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी त्यांच्या घेतलेल्या झडती दरम्यान वाहन चालकाच्या सीटखाली पोलिसांना गावठी कट्टा त्याचे मॅक्झिन, त्याच्यासोबत पाच काडतुसे व एका स्वतंत्र प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ३३ काडतुसे आणि तीन मोबाईल आढळून आले. पोलिस नाईक विजय पवार यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक अभय परमार, उपनिरीक्षक संजय कवडे, सहाय्यक निरीक्षक एन. जी. साबळे, पोलिस नाईक विजय पवार, सुभाष बोडखे, अमृता आढाव, प्रमोद गाडेकर, साईनाथ तळेकर आदींचा समावेश होता. दरम्यान सोनारावरिल हल्ल्यातील मुख्य आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले नसले तरी या घटनेत शहर पोलिसांनी धाडस दाखवत संशयित आरोपींकडून गावठी कट्टा हस्तगत केल्याने शहर पोलिसांची मान उंचावली आहे.