घरमहाराष्ट्रश्रमजीवी संघटनेचा अंबरनाथ तहसिल कार्यालयावर 'वस्ती मोर्चा'

श्रमजीवी संघटनेचा अंबरनाथ तहसिल कार्यालयावर ‘वस्ती मोर्चा’

Subscribe

आदिवासी पाड्यांमधील आदिवासी अनेक सुविधांपासून वंचित असल्यामुळे या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने अंबरनाथ तहसिल कार्यालयावर 'वस्ती मोर्चा'चे सोमवारी आयोजन करण्यात आले होते.

श्रमजीवी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विविध नृत्य आणि गाणी सादर करून आदिवासींनी आपले गाऱ्हाणे मांडले. श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, अशोक सापटे, दशरथ भालके, तालुका अध्यक्ष बाळू हेलम, गोटीराम वाघे आदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. ११) दुपारी अंबरनाथ तहसिल कार्यालयावर वस्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ तालुक्यातील मोरिवली पाडा, ठाकूर पाडा, करवले, काकोळे, बोहोनोली, जावसई आदिवासी पाडा आदी भागातील आदिवासी बांधवानी ‘वस्ती मोर्चा’त सहभागी झाले होते.

या मागण्यांसाठी मोर्चा

आदिवासी पाड्यांवर पिण्यायोग्य शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, आदिवासी वस्ती स्थाने निश्चित व्हावीत, गावपाडयांना वीज पुरवठा व्हावा, राहती घरे आदिवासींच्या नावे व्हावीत, आदिवासी आणि कातकरी कुटुंबियांना अंत्योदय योजनेत समावेश करावा, आदिवासी ठाकूर समाजाला जातीचा दाखला द्यावा, करवले येथील डम्पिंग ग्राउंड रद्द करावे आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

उत्थान अभियान राबविले

शिष्टमंडळाने तहसिलदार जयराज देशमुख यांना यासंदर्भातील निवेदन देऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. आदिवासी बांधवांची संख्या मोजण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी आदिवासी समाजातील काही जातींच्या लोकांची संख्या घटल्याचे समोर आले. त्यानंतर कोकण विभागात कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले. या अभियानात विविध जिल्ह्यातील कातकरी बांधवांना ओळखपत्र, दाखले आणि योजनांची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही विविध आदिवासी पाड्यांमधील आदिवासी अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने ‘वस्ती मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -