अकरावी online admission : शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते संकेतस्थळाचा शुभारंभ

१ हजार ६०० कॉलेजांमधील तब्बल साडे पाच लाख जागासाठीची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना घरबसल्या करता यावी यासाठी संकेतस्थळात यंदा काही बदल करण्यात आले.  

11th admission

दहावीच्या निकालानंतर शिक्षण विभागाने तातडीने अकरावी प्रवेश प्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात केली. शिक्षणमंत्र वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई एमएमआर क्षेत्र आणि राज्यातील सहा महापालिका क्षेत्रातील तब्बल १ हजार ६०० कॉलेजांमधील तब्बल साडे पाच लाख जागासाठीची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना घरबसल्या करता यावी यासाठी संकेतस्थळात यंदा काही बदल करण्यात आले आहेत. यूट्युबच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारणही करण्यात आले.

प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार

राज्यभरात मुंबई एमएमआर क्षेत्र तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिकांच्या क्षेत्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. या प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळ सुरु झाले असून दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. पहिल्या टप्यातील अर्ज कसा भरायचा, त्यानंतर दुसरा टप्पा महाविद्यालय पसंतीक्रम (म्हणजे भाग – २) असणार आहे. पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांची वैयक्तीक माहिती भरायची आहे. अर्ज भरण्यापूर्वी काय तयारी करायची, कोणती काळजी घ्यायची आदी माहितीचे सादरीकरण असलेला एक व्हिडिओ प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे असले तरी विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन करावी लागत होती. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाईन सादर करता येणार आहेत. तसेच त्यांना प्रवेश शुल्कही ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मिळालेला प्रवेश निश्चित करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी कुठेही धावाधाव करु नका सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.

ग्रेडचे गुणांमध्ये रुपांतर करण्याची सोय

आयसीएसई आणि आयजीएससीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुण हे ग्रेडमध्ये दिले जातात. त्यामुळे त्यांना दरवर्षी गुणांमध्ये रुपांतर करण्यासाठी धावपळ करावी लागते. मात्र यंदा बदल करण्यात आलेल्या संकेतस्थळामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची धावपळ होणार नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.