घरमहाराष्ट्ररासपाला विधानसभेसाठी हव्या १४ जागा

रासपाला विधानसभेसाठी हव्या १४ जागा

Subscribe

धनगर समाजासाठी भाजपला पाठिंबा,मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्श

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने रविवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शक्तिप्रदर्शन महत्वाचे मानले जात आहे. या शक्तिप्रदर्शनात रासपने विधानसभेसाठी गेल्यावेळीपेक्षा जास्त जागांची मागणी केल्याने महायुतीतील सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. तरीही आम्ही युतीसोबत राहिलो. मात्र आता विधानसभेसाठी आम्हाला १४ जागा हव्या आहेत, अशी मागणी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुंबईत केली.

रासपच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जानकर यांनी जास्त जागांची मागणी केली. यावेळी जानकर यांच्यासह महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.

- Advertisement -

विधानसभेसाठी १४ जागा मिळाल्या तरच आमच्या पक्षाला मान्यता मिळेल. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये रासपला राजकीय पक्ष म्हणून मान्यता आहे. रासपला दौंडची जागा सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रासप भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही. आम्ही आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवू. पंकजा मुंडे यांनी आमची मागणी पूर्ण करावी, असा आग्रहही त्यांनी यावेळी धरला. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय भाजप सरकारच घेईल. त्यामुळे आम्ही भाजपला साथ देत आहोत, असे जानकर यांनी यावेळी जाहीर केले.

संजय दत्त रासपमध्ये येणार
अभिनेता संजय दत्त येत्या २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षात (रासप) मध्ये प्रवेश करणार आहे, असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. संजय दत्त यांचा आजच पक्षात प्रवेश होणार होता, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत, असे जानकर यांनी यावेळी सांगितले. तर दुसरीकडे संजय दत्त यांचा एक व्हिडिओ रविवारी व्हायरल झाल्याने राजकीय विश्लेषकांच्याही भुवया उंचवल्या आहेत. या व्हिडिओत अभिनेता संजय दत्त यांनी रासपच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्तने एका व्हिडिओद्वारे या शुभेच्छा दिल्या आहेत. जानकर हे माझ्या भावासारखे असून त्यांना मी शुभेच्छा देतो. मी इथे असतो तर नक्कीच त्यांच्या मेळाव्याला आलो असतो, असे संजय दत्तने यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -