घरताज्या घडामोडीमाणुसकी मेली, बसचालक-वाहकाने थांब्यावरच टाकला मृतदेह

माणुसकी मेली, बसचालक-वाहकाने थांब्यावरच टाकला मृतदेह

Subscribe

एसटी बसमध्ये बसलेल्या प्रवाश्याने मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याचा बहाना करत एसटी चालक आणि वाहकाने बसमधील वृद्धाचा मृतदेह प्रवाशांच्या मदतीने खाली उतरवला.

श्रीरामपूर आगाराची श्रीरामपूर-आश्वी ही बस शनिवारी सकाळी आश्वी बुद्रुक येथे आली होती. एसटी बसचा हा शेवटचा थांबा होता. बसमधील सगळे प्रवासी उतरले, मात्र एक प्रवासी निश्चल अवस्थेमध्ये बसमध्ये बसून होता. त्यामुळे चालक आणि वाहकाने बसमधील वृद्ध दारू प्यायला आहे. त्याला खाली उतरण्यास मदत करा, असे सांगत ग्रामस्थ व प्रवाशांच्या मदतीने त्याला बसबाहेर काढून तेथेच ठेवून दिले. त्यानंतर चालक व वाहक बस घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाला पुन्हा भरधाव रवाना झाले. काही वेळानंतर खाली काढलेल्या माणसाची हालचाल दिसेना, म्हणून ग्रामस्थांनी त्याचे निरीक्षण केले असता तो मृत असल्याचा संशय बळावला. त्यामुळे ग्रामस्थांनी बस चालक आणि वाहकाच्या कृतीविषयी नाराजी व्यक्त करत माणुसकीच मेली असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचा – कसारा घाटातील प्रवास धोकादायक…

- Advertisement -

तो वृद्ध मेला आहे याची वाहक व चालकाला माहिती असणारच म्हणून त्यांनी त्याला खाली टाकत भरधाव बस तेथून नेली. आश्वीचे कोतवाल सोमनाथ गाडेकर यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयामध्ये पाठविला. पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्तीचे नाव लक्ष्मण बाबुराव जाधव (वय ६०, मूळ राहणार दरेवाडी तालुका नगर) असे निष्पन्न झाले. जाधव यांच्या पश्चात कोणीच नसल्याने ते अधूनमधून दाढ बुद्रुक (ता. राहता) येथील आपल्या नातेवाईकांकडे राहत असल्याचे व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याचे पुढे आले. दरम्यान मृतदेहाविषयी पोलिसांना माहिती न देता मृतदेह रस्त्यावर टाकून साळसूदपणे निघून जाणाऱ्या चालक व वाहकाच्या कृतीबद्दल संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात आश्वी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजेल अशी माहिती मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -