घरCORONA UPDATEकोरोनाबधितांच्या संपर्कातील १८ जणांना संगमनेर, श्रीगोंदामधून घेतले ताब्यात

कोरोनाबधितांच्या संपर्कातील १८ जणांना संगमनेर, श्रीगोंदामधून घेतले ताब्यात

Subscribe

संगमनेरमधील मुस्लिम बहुल भागातून १५ तर श्रीगोंदामधून ३ जणांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात केली आहे.

अनंत पांगारकर –

नगरमध्ये रविवारी आणखी दोघे कोरोनाबाधित सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू झाला आहे. सोमवारी प्रशासनाने संगमनेरमधील मुस्लिम बहुल भागातून १५ तर श्रीगोंदामधून ३ जणांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात केली आहे. संगमनेरमधील कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. संगमनेरमधील हे सर्वजण कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने आता संगमनेरातदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

नगरमध्ये रविवारी एक कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर लगेच पुन्हा दोन परदेशी नागरिकांना याची लागण झाल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता या दोन रुग्णांच्या संपर्कात कोण कोण लोक आले, याचा जिल्हा प्रशासनाने शोध सुरु केला असतानाच जामखेडमध्ये झालेल्या सामूहिक नमाज पठाणामध्ये या दोन्ही कोरोना बाधितांसोबत संगमनेरातील १५ नागरिक आल्याची माहिती समोर आल्याने संगमनेरचे प्रशासन सतर्क झाले. आरोग्य विभागाच्या पथकासोबत उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी फौजफाट्यासह कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या मुस्लिमबहुल भाग असलेल्या पुणे नाका, नायकवाडपुरा परिसरात धाव घेत संबंधीत १५ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांना तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, हे १५ जण ज्या परिसरातील आहे, त्या भागात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी केली जाणार असून या सर्वांच्या हातावर ‘होम क्वॉरंटाईनचे’ शिक्के मारण्यात सुरुवात झाली आहे. यापैकी एखादी व्यक्ती जर दुर्दैवाने पॉझिटिव्ह आढळली, तर हा संपूर्ण परिसर प्रशासनाकडून सील केला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नगरमध्ये सापडलेल्या दोन्ही परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या मुकुंदनगर परिसरातील ९ नागरिकांनादेखील रविवारी प्रशासनाने ताब्यात घेतले होते. आज हा संपूर्ण परिसर प्रशासनाने सील केला असून आरोग्य यंत्रणा येथे लक्ष ठेवून आहे. तर या दोघांच्या संपर्कात आलेल्या श्रीगोंद्यामधील ३ जणांना आज प्रशासनाने ताब्यात घेतले. येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर मधील १५ जणांची नावे जिल्हा प्रशासनाने संगमनेरच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर डॉ. शशिकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्यासह तातडीची बैठक घेत कारवाईची दिशा ठरवली. त्यानंतर २ वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी मंगरुळे यांनी मोठ्या फौजफाट्यासह नाशिक-पुणे महामार्गालगतच्या नायकवाडपुरा, पुणे नाका आणि संबंधित परिसरात जाऊन तो संपूर्ण परिसर वाहतुकीसाठी बंद करुन संबंधितांना ताब्यात घेतले.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयावरून संगमनेरातील ५० हून अधिक लोकांचे स्त्राव तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. सुदैवाने या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने संगमनेरकरांसाठी हा दिलासा ठरत असतानाच आता थेट कोरोना बाधितांच्या संपर्कातील संशयित संगमनेरात आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढल्याने संगमनेरकरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -