नाशिकमध्ये दिवसभरात २० नवे रुग्ण पॉझिटिव्ह

Three positives on the same day in Nandgaon

नाशिक जिल्हा प्रशासनास शुक्रवारी (दि.५) दिवभरात २० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये दीडवर्षाच्या चिमुकलीसह मालेगावात ५, पंचवटी ३, राहुरी २, विंचूर २, माडसांगावी, निफाड, आंबे दिंडोरी, पंडित कॉलनी नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय, येवला, मनमाड आणि नांदगाव प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सर्व बाधित रुग्ण हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन केले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण १ हजार ४३५ रुग्ण करोनाबाधित आहेत. एकट्या नाशिक शहरात ३२३ रुग्ण आहेत. १४१५ पैकी ९७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक शहर ११६, नाशिक ग्रामीण १५६, मालेगाव शहर ६५८, जिल्ह्याबाहेरील ४३ रुग्ण आहेत.

जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढतच असून, एकूण करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनास दोन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात १० नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तर प्रशासनास दुसर्‍या टप्प्यात सायंकाळी ६.४५ वाजता १० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये माडसांगावी, निफाड, आंबे दिंडोरी, पंडित कॉलनी नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय येथील प्रत्येक एकाचा समावेश आहे. पेठ रोड, पंचवटी येथील तीन आणि राहुरी,नाशिक येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण १४३५ बाधित रुग्ण असले तरी ९७३ रुग्ण बरे झाले असून ३७३ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ६८, नाशिक शहर १९३, मालेगाव शहर ९६, जिल्ह्याबाहेरील रूग्ण १६ आहेत. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १३ हजार ८७ संशयित रुग्णांचे स्वाब तपासाणीसाठी पाविण्यात आले होते. यामध्ये १ हजार ४३५ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, ११ हजार ३७८ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २७४ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित रुग्ण नाशिक ग्रामीण ४७, नाशिक शहर १३०, मालेगाव शहरातील ९७ आहेत.

१४३ रुग्ण दाखल
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात १४३ संशयित रुग्ण उपचारार्थ दाखल झाले. यामध्ये जिल्हा रुग्णालय १२, नाशिक महापालिका रुग्णालय ५१, मालेगाव महापालिका रुग्णालय १५, नाशिक ग्रामीण रुग्णालयात ६५ रुग्ण दाखल झाले आहेत.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रुग्ण – १४३५ (मृत ८९)
नाशिक शहर- ३२३ (मृत 14)
नाशिक ग्रामीण-2३१ (मृत ७)
मालेगाव शहर-81७ (मृत ६३)
अन्य-64 (मृत ५)

शहरात सात नवीन प्रतिबंधित क्षेत्र
नाशिक शहरात एकूण ८० प्रतिबंधित क्षेत्र असून शुक्रवारी नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून खबरदारी म्हणून महापालिकेने आणखी सात नवीन प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्र पुढीलप्रमाणे-१) अमन रो-हाऊस, मातोश्री कॉलनी-खोडेनगर, २) रो-हाऊस २१, गुलशन कॉलनी, पखालरोड, ३) गुरूकृपा बंगला, भगवतीनगर, हिरावाडी, ४) आदित्यकुंज सोसायटी, लोकसहकारनगर, पंचवटी ५) आनंदछाया सोसायटी, साई सर्कल, सातपूर कॉलनी, ६) रो-हाऊस ९६९, म्हाडा कॉलनी, संजीवनगर, अंबड लिंक रोड ७) शिवालय, दातीरनगर, अंबड

शहरात आरोग्यसेविकेसह ५ नवे रूग्ण बाधित
पंचवटीतील दत्तनगर येथील करोनाबाधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाच्या कुटुंबातील ५० वर्षीय महिला, २६ वर्षीय युवती व २८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्या तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदर्भ सेवा रुग्णालय, शालिमार येथील कार्यरत ३५ वर्षीय आरोग्यसेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पंडित कॉलनी येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा प्राप्त झाला आहे. खबरदारी म्हणूनअ आरोग्य विभागाने रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे.