घरमहाराष्ट्र२०० ब्लास्टने उडवला १९० वर्षे जुना अमृतांजन ब्रिज

२०० ब्लास्टने उडवला १९० वर्षे जुना अमृतांजन ब्रिज

Subscribe

कोकणाला महाराष्ट्राशी जोडणारा १९० वर्षे जुना अमृतांजन ब्रिज रविवारी लॉकडाऊनच्या काळात तब्बल ९ तासांच्या मेहनतीनंतर जमीनदोस्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टीमने घेतलेल्या अथक मेहनतीमुळे अतिशय आव्हानाचा असलेला ब्रिज रविवारी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीने जमीनदोस्त करण्यात आला. अनेक आव्हानांचा सामना करत हा ब्रिज जमीनदोस्त करण्यात आला. त्यामुळे या भागात अपघाताचे प्रमाण कमी होतानाच, वाहतुक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. येत्या १५ दिवसांत या ब्रिजखाली एका अतिरिक्त लेनचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा दुतर्फा संपुर्ण तीन लेनचा मार्ग आहे. पण केवळ अमृतांजन ब्रिज परिसरातच हा एक्सप्रेस वे दोन लेन म्हणून कार्यरत होता. अमृतांजन ब्रीज जमीनदोस्त झाल्याने आणखी एक अतिरिक्त लेन या परिसरात तयार करणे शक्य होणार आहे. रविवारी ब्रिज तोडण्याच्या कामात दगडी पिलर्स ब्लास्ट करण्यात आले. नऊ तासांच्या मेहनतीत हे काम पूर्ण करण्यात आले.

- Advertisement -

या ब्लास्टिंगनंतर एकूण १२०० ट्रक इतका मलबा तयार झाला आहे. काही टप्प्यात हा मलबा याठिकाणाहून हटवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिली. हा संपूर्ण मलबा डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येईल. येत्या चार दिवसांमध्ये हा मलबा हटवण्यात येईल. त्यानंतर येत्या पंधरा दिवसात अतिरिक्त अशी तिसरी काँक्रिटची लेन तयार करण्यात येणार आहे. या ब्रिजमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते.

त्यामुळे ब्लॅक स्पॉट म्हणून या ब्रिजची ओळख झाली होती. संपुर्णपणे दगडाचा असा ब्रिज १९० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. त्यामध्ये काँक्रिट कुठेही वापरण्यात आले नव्हते. त्यामुळे ब्लास्टिंग दरम्यान नेमकी आणि मजबुत अशी स्फोटके ठेवण्यासाठीची जागा ड्रिल करणे हे एमएसआरडीसी समोरील एक आव्हान होते. दगडाचे बांधकाम असल्याने अनेक ठिकाणी वारंवार ड्रिल करावे लागले. प्रत्येक पिलरला समोरून ड्रिल करून कंट्रोल ब्लास्टिंग करण्यात आले. काही ठिकाणी पोकळ जागाही सापडल्या त्यामुळे ब्लास्टिंगसाठीची आव्हाने होती, अशी माहिती अनिल गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

या संपूर्ण ब्रिजमध्ये एकुण पाच पिलर्स होते. प्रत्येक पिलरसाठी सरासरी ४० ड्रिल करण्यात आले. त्यानुसार २०० हून अधिक ड्रिल करत हे कंट्रोल ब्लास्ट करण्यात आले. त्यासाठी तज्ञांची टीमही आमच्यासोबत होती. जुना ब्रिज पाडताना नवीन ब्रिजला धोका पोहचणार नाही याचीही दक्षता या कामादरम्यान घेण्यात आली.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -