Corona in Maharashtra: परिस्थिती हाताबाहेर? आजही रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक

राज्यात २०,४८९ नवे रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू

Maharashtra Live Update Covid stat
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

या आठवड्यात महाराष्ट्रात रोज रुग्णसंख्येचा नवा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. सोमवारी पहिल्यांदा रुग्णसंख्या १६ हजारांच्या वर गेल्यानंतर आठवड्यातील प्रत्येक दिवशी हजाराने रुग्णसंख्या वाढलेली आहे. आज तर राज्यात २०,४८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८,८३,८६२ झाली आहे. राज्यात २,२०,६६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३१२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २६ हजार २७६ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे. राज्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांचा एका दिवसाचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात ३१२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३३, ठाणे ११, नवी मुंबई मनपा ४, मीरा भाईंदर मनपा ४, रायगड ५, पनवेल मनपा ४, नाशिक १५, अहमदनगर १५, जळगाव ७, पुणे ३७, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर ८, सातारा १३, कोल्हापूर १८, सांगली ११, औरंगाबाद ९, लातूर ७, उस्मानाबाद ६, नांदेड १५, यवतमाळ ७, नागपूर ३१, अन्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३१२ मृत्यूंपैकी १९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू औरंगाबाद ५, कोल्हापूर ५, पुणे ५, ठाणे ४, चंद्रपूर २, रायगड २, जालना २, अहमदनगर १, जळगाव १, मुंबई १, नाशिक १, परभणी १, रत्नागिरी १ आणि पालघर १ असे आहेत.

आज १०,८०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६,३६,५७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४५,५६,७०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८,८३,८६२ (१९.३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८१,९०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.