नवी मुंबई पालिका कर्मचार्‍यांना २५ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान!

करार, तसेच तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना १९ हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान

Diwali Bonus

यावर्षीचा दिवाळी सण १४ नोव्हेंबर पासून सुरू होत असून नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचार्‍यांना २५ हजार व करार, तसेच तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना १९ हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण ४६१० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मागील वर्षी देखील अधिकारी व कर्मचार्‍यांना २५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यात कोणतीही कपात न करता यंदा देखील तेवढाच बोनस जाहीर करण्यात आला आहे. एमएमआर रिजनमध्ये कर्मचार्‍यांना सर्वाधिक बोनस देणारी नवी मुंबई महापालिका आहे. सुरवातीपासूनच मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांपेक्षा अधिकचा बोनस नवी मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना देण्यात येतो. यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्ती, प्रशिक्षणार्थी अधिकारी – कर्मचारी यांना २५ हजार सानुग्रह अनुदान दिले जात आहे.

तसेच किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना १९ हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जात आहे. याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियानांना शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पद्धतीवरील कर्मचा-यांप्रमाणे १९ हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशावर्कर्सना ९ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. सध्याच्या कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी सुरूवातीपासून कोव्हीड विरोधातील लढ्यात अत्यंत समर्पित भावनेने काम करीत असून त्यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता प्रशासक तथा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या या कर्मचारीहिताय निर्णयाचे अधिकारी-कर्मचारी वृंदाकडून स्वागत करण्यात येत आहे.

जीव धोक्यात घालून बजावले कर्तव्य

कोविडच्या काळात देखील कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात टाकून आपले कर्तव्य बजावले. सर्वोत्कृष्ट महानगरपालिका म्हणून नवी मुंबईला सातत्याने देशात तिसरा व राज्यात पहिला क्रमांक मिळवून देण्यात कर्मचार्‍यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना योग्य न्याय देण्याचे कर्तव्य प्रशासन प्रमुख या नात्याने पालिका आयुक्तांनी पार पाडल्याची भावना कर्मचार्‍यांमध्ये आहे.