एकाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान

वर्धा जिल्ह्यातील उमेश अग्रवाल यांच्या निधनानंतर त्यांचे अवयवदान करण्यात आले आहे. यातून आता ३ लोकांना जीवनदान मिळणार आहे.

Mumbai
organ donate
अवयवदान (प्रातिनिधीक फोटो)

‘मरावे परी अवयरूपी उरावे’ ही आधुनिक म्हण सार्थ करणारी घटना वर्ध्यात घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील उमेश अग्रवाल यांच्या निधनानंतर त्यांचे अवयवदान करण्यात आले आहे. यातून आता ३ लोकांना जीवनदान मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रीन कॅरीडोअरच्या माध्यमातून आज, शुक्रवारी त्यांचे अवयव नागपूरला रवाना करण्यात आले आहे.

अपघातात मृत्यू झालेल्याचे अवयवदान

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी असलेले धान्य व्यवसायिक उमेश राधाकिसन अग्रवाल यांचा ४ डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला. त्यांना स्थानिक रेडिएंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर विविध तपासण्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या. यात डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेथ म्हणून घोषित केले. त्यांची पत्नी आणि भाऊ सुनील अग्रवाल यांना अवयवदानाची तसेच शहरातील अवयवदान चळवळीतील लोकांची माहिती होती. रेडिएंटच्या डॉक्टरांनीही त्यांच्या कुटुंबीयाचे समुपदेशन केले. त्यानुसार उमेश अग्रवाल यांच्या दोन्ही किडनी, डोळे आणि लिव्हर दान करण्याचा निर्णय अग्रवाल कुटुंबियांनी घेतला.

तीन विविध हॉस्पिटल्सना दान

त्यानुसार हरिना फाऊंडेशनचे अवयवदान आणि नेत्रदान समिती, रेडिएंट हॉस्पिटल तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या संयुक्त प्रयत्नाने अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. आज सकाळी ६ वाजतापासून अवयवदान प्रक्रिया पार पडली. नागपूरच्या न्युएरा हॉस्पिटलला लिवर, वोक्हार्ट हॉस्पिटला आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला किडनी दान करण्यात आली. तसेच हरिना नेत्रदान समितीला डोळे दान करण्यात आले. न्युएरा हॉस्पिटलचे डॉ. सक्सेना, वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. संजय कोलटे, आयकेअर हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश खेतान, हरिना नेत्रदान समितीचे मनोज राठी, चंद्रकांत पोपट, सुनील मंत्री, शरद कासट, राजप्रकाश गिलडा यावेळी उपस्थित होते.