विसर्जनाकरता ३ हजार १३८ पोलीस अधिकारी तैनात

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ३ हजार १३८ पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

Pune
3 thousand 138 police officers were deployed to ganpati immersion
विसर्जनाकरता ३ हजार १३८ पोलीस अधिकारी तैनात

‘यंदाच्यावर्षीही मागीलवर्षी प्रमाणेच गणेश विसर्जन मिरवणूक पार पडेल. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी शहरात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून गुरूवारी सकाळपासून शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. नागरिकांनी उत्साहात आणि शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पडण्यासाठी सहकार्य करावे’, असे आवाहन पोलीस आयुक्त के. वेकंटेशम यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.

मार्गावर व्हिडीओ वॉल उभारणार

मानाच्या पाच मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक दरवर्षीच्याच वेळेत अर्थात सकाळी दहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होईल. प्रमुख विसर्जन मिरवणुकीतील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावर पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सेक्टरनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या मार्गावरील मिरवणुकीमध्ये ६०२ मंडई सहभागी होतात. याठिकाणी ३ हजार १३८ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार असून एसआरपीएफच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच या प्रमुख मार्गावर व्हिडीओ वॉल उभारण्यात येणार आहेत.

हे रस्ते बंद ठेवण्यात येणार

या मार्गावरील मिरवणुकीवर २६९ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार असून फरास खाना पोलीस ठाण्यामध्ये मुख्य कंट्रोल रूम असणार आहे. गुरूवारी विसर्जनाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बगाडे रोड, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रोड, केळकर रस्ता, गुरूनानक रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, नळ स्टॉप ते खंडोजीबाबा चौक दरम्यानचा कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक ते जेधे चौक रस्ता, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक आणि प्रभात रस्ता टप्प्याटप्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन डॉ. पंकज देशमुख यांनी यावेळी केले.

ढोल पथकांवर निर्बंध

ढोल पथकांमधील वादक आणि सहकारी असे १०० जणांच्या पथकाला परवानगी देण्यात आली आहे. पथकात सहभाग असलेल्यांना पोलिसांचे पासेस बंधनकारक केले आहे. ढोल पथकांना शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मानाच्या मंडळासमोर अधिकाअधिक तीन तर अन्य मंडळांसमोर दोनच ढोल पथकांना परवानगी दिली असून त्यांनी नमूद केलेल्या चौकातच वादन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. एका मंडळामध्ये सहभागी झालेल्या ढोल पथकांना अन्य मंडळांत वादनाची परवानगी देण्यात येणार नाही, असे सह पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र शिसवे यांनी नमूद केले.

पोलिसांचा बंदोबस्त

विसर्जन मिरवणुकीसाठी  चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १२ डीसीपी, २७ एसीपी, १५० पोलिस निरीक्षक, ४६१ उपनिरीक्षक, ७,४५७ पोलिस कर्मचारी, दोन एसआरपीएफच्या तुकड्या, १६ शीघ्र कृती दल, ७ बीडीडीएसच्या तुकड्या, ७०० होमगार्ड, ३० हजार स्वंयसेवक, निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी, एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी बंदोबस्तावर असणार आहेत.


हेही वाचा – गणपती विसर्जनाकरता पोलीसांच्या सुट्ट्या रद्द