राजमाता जिजाऊंची ४२१ वी जयंती, सिंदखेडराजाला शिवभक्तांची मोठी गर्दी!

आज राजमाता जिजाऊ यांची ४२१ वी जयंती आहे. जिजाऊंच्या जयंती दिनानिमित्ताने लाखो शिवभक्तांनी जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे गर्दी केली आहे. स्वराज्य उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी दिलेले मार्गदर्शन फार मौल्यवान ठरले आहे.

Buldhana
421th birth aniversary of rajmata jijau
आज राजमाता जिजाऊंची ४२१ वी जयंती!

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची ४२१ वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने हजारो शिवभक्तांनी मॉं साहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी मोठी गर्दी केली आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत जिजाऊंचा मौल्यवान असा वाटा आहे. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. गरिब, शोषित प्रजेसाठी स्वराज्य उभारणीचा मंत्र हा जिजाऊंचाच होता. त्यामुळे हजारो शिवभक्त त्यांच्या जयंती दिनानिमित्ताने दरवर्षी सिंदखेडराजा येथे येतात.

‘असा’ होता जिजाऊंचा जीवनप्रवास

राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा येथे झाला. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. जिजाऊंना चार भाऊ होते. दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे जिजाऊंच्या चार भावांची नावे होती. जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. डिसेंबर १६०५ मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला. शहाजी राजे निजामशाहीचे सरदार होते. १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाऊंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली तर दोन मुले होती. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. शिवबांना त्यांनी लहानपणीच रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर जिजाऊंच्या आज्ञेत शिवाजी महाराज युद्ध कला शिकले. गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही आऊंसाहेबांची इच्छा होती. १६५५ साली जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र संभाजी हे विजापूरतर्फे लढताना मरण पावले. २३ जानेवारी १६६४ रोजी तुंगभद्रेच्या काठी शिकारीला गेले असता शहाजी राजांच्या घोड्याचा पाय रान वेलीत अडकला आणि शहाजी राजे घोड्यावरुन पडले. या दुर्घटनेत शहाजी महाराजांचा मृत्यू झाला. जिजाऊ विधवा झाल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर देखील जिजाऊंच्या विचारांचे छत्र होते. १७ जून १६७४ रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली.

म्हणून सिंदखेड राजाला शिवभक्तांची गर्दी

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. या आराध्य दैवताला संस्कार देण्याचे काम जिजाऊंनी केले आहे. परंतु, या राजमातेवर ज्या ठिकाणी संस्कार झाले ते ऐतिहासिक स्थळ म्हणजे सिंदखेडराजा. त्यामुळे लाखो शिवभक्त त्यांच्या जयंतीदिनी सिंदखेडराजाला येतात. आज सिंदखेडराजा हे गाव फक्त ऐतिहासिकच नाही तर पर्यटन स्थळ बनले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here