घरदेश-विदेशयेडियुरप्पांच्या उदासीनतेवर देवेंद्र फडणवीसांचे पांघरूण

येडियुरप्पांच्या उदासीनतेवर देवेंद्र फडणवीसांचे पांघरूण

Subscribe

अलमट्टीेमधून तात्काळ विसर्ग झाला नाही

अतिवृष्टीमुळे सांगली, सातारा, कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण होऊन लोक बेहाल झालेले असताना तात्काळ अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करून दिलासा देण्याची गरज असताना कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या उदासीनतेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पांघरूण घातले.

सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी आढावा घेतला. अलमट्टी धरणात कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन सरकार करत असलेल्या मदत आणि बचावकार्याची माहिती दिली. पाण्याची पातळी वाढू लागताच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग का झाला नाही? याबाबत मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

- Advertisement -

पहिल्या दिवसापासून कर्नाटक सरकारशी आमची चर्चा सुरु होती. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केली होती, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मात्र हे करत असताना त्यांनी कर्नाटकातील भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री येडियुरप्पांची बाजू सावरून धरली. येडियुरप्पा यांनी तात्काळ पावले उचलली असती तर पश्चिम महाराष्ट्रात पाणी साठून इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली नसती.

अलमट्टीतून चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होतो, तेव्हा कर्नाटकची काही गावे पुराखाली जातात. त्यामुळे येडियुरप्पा यांच्याशी बातचीत केल्यानंतर अलमट्टीतून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शनिवारी दुपारपर्यंत धरणातून ५ लाख ३० हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. पुढच्या ४८ तासांत सांगलीतील पूर ओसरण्यास सुरुवात होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

कर्नाटकमध्ये महिन्याभरापूर्वीच सत्तांतर झाले. भाजपने कुमारस्वामीच्या ताब्यातून सत्तेची खुर्ची हिसकावून घेतली. जर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार असते तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशीच मवाळ भूमिका घेतली असती का? असाही प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. विरोधकांचे काम कमतरता दाखविण्याचे आहे, ते त्यांनी जरूर करावे. पण पूरपरिस्थितीचे राजकारण करु नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आतापर्यंत २००५ च्या पुराला ग्राह्य धरून मदतकार्याचे नियोजन केले जात होते. मात्र यापुढे यावर्षीच्या पावसाचे प्रमाण आणि दाहकता लक्षात घेऊन आगामी काळात नियोजन करावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. चार महिन्यात पडणारा पाऊस जर दोन दिवसांत पडत असेल तर आपण काहीच करु शकत नाही. सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन दिवसांत अचानक जास्त पाऊस पडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. कधी, किती पाऊस पडेल हे आधीच ओळखण्याचे तंत्रज्ञान अजूनतरी अस्तित्वात नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -