घरमहाराष्ट्रखालापुरात ५० लाखांचा गुटखा जप्त

खालापुरात ५० लाखांचा गुटखा जप्त

Subscribe

 पोलिसांचे धाडसत्र सुरू

तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गुटखा विक्रीचा भांडाफोड केला आहे. जवळ-जवळ 50 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतूक करणारी 2 वाहने असा एकूण 57 लाख 82 हजार 100 रुपयांचा माल जप्त केला आहे. आठवडाभरापासून रायगड जिल्ह्यात गुटखा विक्रीविरोधात पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे.

अलिबाग, पेण येथील कारवाईनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला तालुक्यात कलोते गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असून विक्रीसुद्धा होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हा अन्वेषणचे एपीआय ए. सस्ते, पोलीस नाईक सागर शेवते, सुभाष पाटील, संदीप चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी रात्री कलोते हद्दीत निर्जन भागात असलेल्या बोराडे फार्म हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी फार्महाऊसवर गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला. गुटखा विक्रीसाठी बाहेर पाठविण्यात येणार असल्याने वाहतुकीसाठी आणलेले दोन टेम्पोदेखील पोलिसांनी जप्त केले आहेत.

- Advertisement -

याप्रकरणी राशिद रखू शेख (38, रा.रॉयल प्लाझा, शिळफाटा खोपोली, ता.खालापूर), संतराम यारिया (20), मुजिबूर रहमान समशेर अहमद (23, दोघे रा.सध्या बोराडे फार्म हाऊस कलोते, मूळ उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. म्होरक्या सद्दाम (रा. मुंबई,) याचा पोलीस शोध घेत आहेत.

कलोते भागातील फार्महाऊसवर गुटख्याचा मोठा साठा सापडल्याने पुन्हा हा भाग चर्चेत आला आहे. या अगोदर कलोते खत्री फार्म हाऊस रेव्ह पार्टीमुळे चर्चेत आले होते. त्यामुळे या भागातील फार्महाऊसची तपासणी मोहीम पोलिसांनी हाती घ्यावी, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -