सांगोल्याचा बाहुबली…हाताने पाडले ५६ बोअर!

mumbai

अलिकडच्या काळात विंधन विहीर म्हणजेच बोअर हे मशीनने पाडले जातात. मात्र हाताने बोअर पाडणारा एक अवलिया सांगोला तालुक्यात असून त्याने ५६ विंधन विहिरी तयार केल्या आहेत. दत्ता शिंदे असे या कलाकाराचे नाव आहे. आत्तापर्यंत एक दोन नाही तर तब्बल छपन्न आड त्यांनी हातानी बनवले आहेत. तेही अगदी एका आकारात. सांगोल्याची ओळखच कायम दुष्काळी तालुका आणि या तालुक्यातील बलवडी गाव देखील पिढ्यानपिढ्या अवर्षणाच्या दुष्टचक्रात अडकलेले आहे. अशा या बलवडी गावात पिण्याच्या पाण्याची कायम भीषण टंचाई असताना बोअर पडणे देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर होते. यातील एक असलेल्या दत्ता शिंदे यांनी हाताने बोअर पडायच्या प्रयोगाला ८ वर्षांपूर्वी सुरुवात केली.

 

पूर्वीच्याकाळी पिण्याच्या पाण्यासाठी लहान लहान आड केले जायचे आणि हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून दत्ता शिंदे यांनी छोटे दांड्याचे फावडे आणि छोटी कुदळ याचा वापर करीत एकट्यानेच आड बनवायला सुरुवात केली. ३ फूट एवढा अतिशय बारीक व्यास धरून याचे खोदायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या प्रयत्नाला यश येऊ लागले आणि अतिशय कमी खर्चात शेतकऱ्यांना हा मानवी बोअर हातानेच आड काढून देऊ लागला. मदतीला पत्नी आणि एखादा मजुराच्या सहाय्याने ते हळूहळू तो आड खोल करीत जाऊ लागले आणि पाहतापाहता चक्क एकाच मापात १०० फूट खोल विंधन विहीर तयार होवू लागली. जसेजसे जमिनीच्या पोटात खोदाई करायला लागायची तशी प्रचंड उष्णता , कमी प्राणवायू अशा त्रासाला त्यांना तोंड द्यावे लागे . पण आता गेल्या आठ वर्षात याची चांगलीच सवय होऊन गेली आणि आज त्याच्या नावावर तब्बल ५६ आड विविध ठिकाणी तयार झाले . दत्ता हे अगदी एका रेषेत खोलपर्यंत हे बोअर तयार करतत . जमिनीचा शेवटच्या स्तराला जेंव्हा पाणी लागते तेंव्हाच त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरते . एखादा पाणाड्या चुकल्यावर १०० फूट खोलीवरून पुन्हा जमिनीत आडव्या रेषेत ३० फुटापर्यंत खोडात जाऊन ते शेतकऱ्याला पाणी मिळवून देतात. त्यामुळेच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या बलवडीमधील शेतकरी या मानवी बोअरमुळे आता बागायती शेतीची स्वप्ने पाहाण्यास सुरुवात केली आहे.


आपल्या परिस्थितीमुळे जगण्यासाठी जीवावर उदार होऊन दत्ता करीत असलेल्या या कामामुळे आज बलवडीत त्यांनी तयार केलेल्या आडातील पाण्यामुळे शेततळी भरू लागली असून आता परिसरात डाळिंब बागा आणि इतर पिके जिवंत राहिली आहेत . आज या परिसरात जनावरांसाठी हिरवा चारा मिळू लागलाय तर अनेक मंडळी आता या पाण्यावर नवीन बागा लावू लागले आहेत . दत्तांनी स्वतःच्या हाताखाली शिकणारे अजून ३ जणांना असे हातानी बोअर पडायला शिकवले असून आता ही मंडळी देखील परिसरात अशा पद्धतीची आड तयार करू लागली आहेत . त्यामुळेच आज बलवडीतील डॉ अशोक कवडे यांनी दोन महिन्यापूर्वी केलेल्या आडातून आता आपले शेततळे भरून घ्यायला सुरुवात केली आहे . कायम दुष्काळी असलेली माझी जमीन आता बागायत होणार असे सांगणारे कवडे म्हणतात बलवडी भागात अनेक शेतकरी दत्तामुळे बागायतदार झाल्याचे सांगतात . दत्ता सारखा माणूस तालुक्यात काय जिल्ह्यात देखील शोधून सापडणार नाही असे सूर्यकांत यादव म्हणतात. मशीनने बोअर पडल्यास शेतकऱ्याला सव्वा ते दीड लाख खर्च येतो मात्र हेच काम दत्ता केवळ २५ हजारात करीत असल्याने शेतकऱ्यांना दत्ताचे मानवी बोअर आपले वाटते.