कंगनापासून दूर राहा आणि चौकशी थांबवा; गृहमंत्र्यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे ९ फोन

Kangana and Anil Deshmukh

अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबई संबंधीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. शिवाय, ड्रग्ज प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यानंतर अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून सातत्याने धमकीचे फोन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसात कंगनापासून दूर रहा, अशी धमकी देणारे ९ फोन आले आहेत.

अनिल देशमुख यांना मंगळवारी ८ सप्टेंबरला ‘कंगनापासून दूर रहा, तुम्ही चुकीचं केलंय, आतातरी चूक सुधारा’ अशी धमकी देणारे जवळपास ७ फोन आले. त्यानंतर आज ९ सप्टेंबरला पहाटे देखील २ धमकीचे फोन आले. आतापर्यंत गृहमंत्र्यांना कंगना प्रकरणी ९ धमकीचे फोन आले आहेत. हे फोन वेगवेगळ्या क्रमांकांवरुन येत असल्याचं समजतंय. या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

कंगनापासून दूर रहा आणि तिच्याविरोधातील कारवाई थांबवा अशी धमकी सातत्याने देत आहेत. आम्ही जे सांगतोय ते गांभिर्याने घ्या आणि तुमची चूक सुधारा, अशी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणाची मुंबई पोलीस चौकशी करत आहे. दरम्यान, शिवसेनेला खुलं आव्हान दिल्यानंतर कंगना राणौतच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेकेडून नोटीस बजावण्यात आली आहे. तर दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप करण्यात आला असून तिची ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हरामखोरीच; शिवसेनेचे भाजपवर आसूड