करोना व्हायरस : डॉक्टर आणि नर्सेसचे स्त्राव तपासणीसाठी, नगरचे वैद्यकीय क्षेत्र हादरले

मंगळवारी दुपारी नगरमध्ये आणखी एक करोना बाधित आढळल्यानंतर जिल्हा हादरला.

Ahamadnagar
one positive corona patient in ahmednagar

अनंत पांगारकर, अहमदनगर

मंगळवारी दुपारी नगरमध्ये आणखी एक करोना बाधित आढळल्यानंतर जिल्हा हादरला. दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या नगरमध्ये वाढत असल्याने जिल्हा प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. दरम्यान करोनाचा तिसरा रुग्ण हा वैद्यकीय सेवेतील असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयातील नर्सचे स्त्राव नमुनेदेखील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात बोलाविण्यात आले होते.

परदेश प्रवास केलेल्या एका रुग्णाला करोनाची लागणी झाल्याचे जिल्ह्यात प्रथम समोर आले होते. त्यापाठोपाठ दुसरा रुग्णदेखील यातुनच पुढे आला होता. आता तिसरा जो रुग्ण सापडला जो त्याची परदेश प्रवासाची कोणतीही हिस्ट्री नसल्याने त्याला करोनाची कशी लागण झाली, त्याच्या संपर्कात कोण-कोण आहे याचा शोध घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. नगर शहरामध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या या रुग्णाला सर्दी आणी खोकल्याचा त्रास होत असल्याने तो काही दिवस एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे ते रुग्णालय आणि तेथील कर्मचारी आता आरोग्य विभागाच्या रडारवर आहे. हा रुग्ण ज्या-ज्या लोकांच्या संपर्कात आला त्या सर्वांचीच तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयाने सोमवारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवलेल्या १३ स्त्राव नमुन्यांपैकी जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नगरची बाधितांची संख्या तीन झाली. बाधीत व्यक्तीला तात्काळ आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात दाखल करण्यात आले. ज्या रुग्णालयात सुरुवातीला या रुग्णावर उपचार करण्यात आले, त्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि नर्सचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहे.

एका बाधिताचा पहिला अहवाल निगेटिव्ह

यापुर्वी नगरमध्ये आयसोलेशन कक्षात दाखल असलेले दोन्ही करोनाबाधित ठणठणीत आहेत. यापैकी एकाचा चौदा दिवसांनंतरचा अहवाल निगेटिव्ह आला. ही दिलासादायक बाब ठरली असून या रुग्णाच्या दुसऱ्या टेस्टचा अहवाल आल्यानंतर तो करोनामुक्त होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे या रुग्णाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरमधील करोनाबाधितांची संख्या तीन झाली आहे. नगर शहरात बाधीत रुग्ण सापडल्याने प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळा, प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा. करोनाचा प्रादुर्भाव पाहता हे संकट वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कायद्याचे पालन करावे. – राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, नगर

तपासणी केलेले संशयित – २६३

घरीच देखरेखीखाली असलेले – २५६

तपासणीसाठी पाठविलेले स्त्राव – २१८

आत्तापर्यतचे निगेटिव्ह स्त्राव – २००

बाधित रुग्ण संख्या – ३

विलगीकरण कक्षात दाखल – ३

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here