घरमहाराष्ट्रयुतीकडे निधीचा दमदार ओघ

युतीकडे निधीचा दमदार ओघ

Subscribe

काँग्रेस उमेदवारांकडे वानवा

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांसाठी निधीचा ओघ येऊ लागला असताना युतीच्या उमेदवारांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडे मात्र निधीची वानवा आहे. प्रचारासाठी आवश्यक असलेला अपेक्षित निधी मिळत नसल्याने या पक्षाचे उमेदवार हैराण झाले आहेत. युतीच्या विशेषत: भाजप उमेदवारांच्या प्रचाराला तोंड देणे काँग्रेस उमेदवारांना निधीअभावी अवघड जात असल्याची बाब उमेदवारांनी आपल्या प्रदेशाध्यक्षांच्या नजरेस आणून दिली आहे.

मात्र तरीही निधी प्राप्त होत नसल्याचे सांगितले जाते. यामुळे उमेदवारांची त्रेधा उडते आहे. काँग्रेस पक्षाच्या निधीचा ओघ कमी झाल्याची बाब नेत्यांकडून पुढे केली जात आहे. विशेषत: पक्ष नेत्यांना प्रचारावेळी करायच्या खर्चालाही कात्री लावण्यात आल्याचे उमेदवारांना सांगितले जात आहे. याशिवाय निधीअभावी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयांमधील रोजचा खर्च कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

राज्यात विधानसभा निवडणुकांचा माहोल सुरू झाल्यापासून प्रचाराला जोर चढला आहे. या निवडणुकीतील मुख्य लढत ही भाजप-सेना युती आणि काँग्रेस आघाडी अशी आहे. दोन्हीकडून प्रचाराची आखणी सुरू असताना युतीच्या उमेदवारांकडे निधीचा ओघ असल्याचे जाणवू लागले आहे. मोठ्या सभांसह कॉर्नर सभांचे जोरदार आयोजन युतीकडून म्हणजे प्रामुख्याने भाजपकडून केले जात आहे. राज्यभर भाजपकडून येत्या आठवडाभरात सुमारे साडेचारशे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यात केंद्रीय मंत्र्यांपासून विविध राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्या सभांचा धडाका लावण्यात येत आहे. एकीकडे भाजपच्या प्रचाराचा असा धडाका सुरू असताना आघाडीचा प्रचार मात्र शरद पवार यांना एकाकी करावा लागत आहे. त्यातच आघाडीच्या उमेदवारांना निधीच्या कमतरतेने हैराण केले आहे. विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.

निधी नसल्याने अनेक उमेदवारांनी ही बाब पक्षाच्या नेत्यांसमोर ठेवली. मात्र नेत्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने उमेदवार चांगलेच हबकले आहेत. निधीसाठी विचारणा केल्यावर काही नेत्यांनी पक्ष कार्यालयातीलच खर्च आवरता घेण्यात आल्याचे सांगितले जाते. पक्षाकडून येणार्‍या निधीतही कमतरता असल्याने जवळच्या प्रचारासाठी नेत्यांनी शक्यतो रेल्वे प्रवासाचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीचा प्रवास करून दुसर्‍या ठिकाणी रवाना होण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून रात्रीच्या हॉटेलमधील वास्तव्याचा खर्च वाचवता येईल.

- Advertisement -

अफाट खर्चापुढे आम्ही तोकडेच
भाजप उमेदवारांकडून होत असलेला खर्च लक्षात घेतला तर आम्हाला त्या तोडीने खर्च कधीच करता येणार नाही. अनेक ठिकाणी त्या पक्षाचे उमेदवार अक्षरश: पैशांची उघळण करत आहेत. ही निवडणूक म्हणजे पैशांची उघड उधळपट्टी असल्याने तिला पुरे पडणे आघाडीच्या उमेदवारांना शक्य नाही. मात्र तरीही त्यांना आम्ही जेरीस आणू.
– विद्या चव्हाण, प्रवक्त्या, राष्ट्रवादी काँग्रेस

उधळणीचा कहर
पक्षाकडील निधीचा विषय नाही. ज्या प्रमाणात भाजपचे उमेदवार निवडणुकीत पैशांची उधळण करत आहेत ते पाहिले तर इतका पैसा आमच्या हयातीत निवडणुकीसाठी आम्ही कधीच खर्च केलेला नाही. इतका पैसा खर्च करण्याची आमच्या पक्षात पध्दत नाही. जे आहे त्यात आमचा पक्ष सामना करेल.
– पृथ्वीराज चव्हाण, नेते, काँग्रेस

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -