संगमनेरच्या दोन महिलांसह अकोल्यातील एकाला कोरोनाची लागण

महिलांवर नाशिकमध्ये तर पुरुषावर नगरमध्ये उपचार सुरू, नगर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७४

Nashik
The government report of the victim at Lingdev is also positive
संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना आणि आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या अकोले तालुक्यातील लिंगदेव  येथील  एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तालुक्यातील निमोण येथील कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.
दिनांक १९ मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या आणि संगमनेरपासून काही अंतरावरील अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील एका व्यक्तीचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीला अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये पुन्हा स्त्राव तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
नाशिक येथे बाधीत आढळलेला रुग्ण हा मुळचा संगमनेर तालुक्यातील निमोण येथील आहे. त्याची आई आणि पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे बाधित आठळलेली व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. या व्यक्तीला गावातील शाळेतच क्वारटाईन करण्यात आले होते. दहा दिवस झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी हॉस्पिटलमधून घशातील स्त्राव चाचणी खाजगी प्रयोगशाळेतून करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, स्त्राव चाचणी नमुना घेताना योग्य ते निर्देश पाळले गेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची पुन्हा स्त्राव चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४
शनिवारी निमोणमध्ये आढळलेल्या दोन महिला रुग्णांसह जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ७४ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यात संगमनेरची संख्या सर्वाधिक असून आत्तापर्यंत दोघांचे मृत्यू झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here