उडाणटप्पूंच्या हैदोसामुळे नागोठणेकर त्रस्त !

पोलिसांचेही काही चालेना

Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोटरसायकल किंवा अन्य दुचाकींवरून उनाडक्या करणार्‍या तरुणांनी अक्षरशः हैदोस घातला असून, त्यांच्यापासून होणार्‍या त्रासाला नागरिक वैतागले आहेत. मोक्याच्या जागी थांबून मुलींची छेडछाड करण्याचे प्रकारही घडत आहे. पोलिसांनाही ते जुमानत नसल्यामुळे पालक हतबल झाले आहेत. पोलिसांनी वेळीच या उडाणटप्पूंना आवरले नाही तर थेट जिल्हा पोलीस प्रमुखांना साकडे घालण्याचा निर्णय संतप्त पालकांनी घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत नागोठणे गावाने कात टाकत शहराकडे वाटचाल केल्यानंतर बाहेरून नोकरी, व्यवसायासाठी आलेल्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे कोण कुणाला ओळखत नाही अशी काहीशी परिस्थिती येथे झाली आहे. याचाच गैरफायदा घेऊन अनेक तरुण उधळल्यासारखे वागताना दिसतात. यापैकी काही तरुण अन्य गावांतून शहरात येत असतात. सकाळपासून ते थेट रात्रीपर्यंत या तरुणांची टोळकी किंवा एकटे-दुकटे फिरताना दिसतात. यांना पोलिसांची अजिबात भीती नसल्याने वाहतुकीचे नियम तोडून ते वेगाने वाहन चालवत असतात. शिवाजी चौकातून खुमाचा नाका, गांधी चौक मार्गे पुन्हा शिवाजी चौक या मार्गावर तरुण सुसाट वेगाने दुचाक्या चालवितात. त्याचा पादचार्‍यांना त्रास होतो. या तरुणांना कुणी हटकण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धावून येतात किंवा संघटित गुंडगिरीची भाषा वापरून ‘बघून घेण्याची’ धमकी देतात.

पोलीसही या उनाड तरुणांना रोखण्याच्या किंवा हटकण्याच्या भानगडीत पडत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एखादी दुर्घटना घडली किंवा दुर्घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा सवाल निर्माण झाला तर पोलीस त्याची जबाबदारी घेणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही मस्तवाल तरुण शाळा किंवा ट्युशन क्लासच्या वेळेत मोक्याच्या ठिकाणी थांबून मुलींची छेडछाड करीत असतात. यात तक्रार केली तर आपलीच इज्जत जाईल, या भीतीने पालक पोलिसांत जाण्यास धजावत नाहीत. मात्र संतापलेल्या काही पालकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे जाण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील गर्दीच्या किंवा महत्त्वाच्या ठिकाणी बेफामपणे दुचाकी हाकणार्‍या तरुणांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्या पालकांनाही योग्य समज द्यावी, अशी मागणी उडाणटप्पूंच्या कारनाम्यांना वैतागलेल्या नागरिकांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही तरुण गांधी चौक, तसेच श्री शंकर आणि श्री हनुमान मंदिराच्या आसपास कोणतेही काम नसताना थांबलेले दिसून येतात. मंदिरांच्या ट्रस्टने यापूर्वीच पोलिसांकडे पत्र पाठवून याबाबत लक्ष वेधले आहे. गांधी चौकात गर्दी असताना वेगाने वाहन चालविणे, थांबून टारगटपणा करणे असे प्रकार अनेकदा नजरेस येत आहेत. मंदिराच्या परिसरात सायंकाळनंतर फारशी वर्दळ नसल्याने काही तरुण नशिल्या पदार्थांचे सेवन करण्यासाठी एकत्र येत असल्याचेही अनेकांनी अनेक वेळा पाहिले आहे. याशिवाय शृंगार तलावाच्या परिसरातही असा प्रकार घडत असल्याचे जागरुक नागरिक सांगतात. कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करणार्‍या या टारगट तरुणाईला पोलीस कुणाचाही मुलाहिजा न ठेवता रोखणार आहेत का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कारवाई करणार..
पोलीस या उनाड तरुणाईची योग्य पद्धतीने दखल घेतील. तसेच कोणत्याही कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी ठिय्या मारणार्‍या किंवा थांबणार्‍या तरुणांविरोधात कठोर पावले उचलली जातील. तसेच या तरुणांना थांबण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍यांनाही समज दिली जाईल. बेदरकार वाहनचालकांविरुद्धची कारवाई अधिक कडक केली जाईल.
-दादासाहेब घुटुकडे, पोलीस निरीक्षक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here