उद्योगपती मित्तल यांच्या रिसॉर्टवर आज हातोडा

Mumbai

प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बांधलेल्या हॉलिडे रिसॉर्टचे वाढीव बांधकाम शुक्रवारी 8 नोव्हेंबरपासून पाडण्यास सुरुवात होणार आहे. प्रांत शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी गुरुवारी या रिसॉर्टची पाहणी केली.

बॉम्बे इन्व्हायर्नमेन्ट अ‍ॅक्शन ग्रुप आणि इतरांनी मित्तल यांच्या या अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. 1 नोव्हेंबर 2018 रोजी न्यायालयाने अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी मित्तल यांना 21 एप्रिल 2019 पूर्वी अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडावे अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल अशी नोटीस दिली होती. मात्र त्यांनी स्वतःहून बांधकाम पाडण्यास सुरुवात केली असली तरी पूर्ण बांधकाम पाडले नाही. त्यामुळे प्रशासनाने दिलेली मुदत संपल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता हे बांधकाम पाडण्यात येणार आहे.

तालुक्यातील किहीम येथील डायमंड किंग नीरव मोदी, धोकवडेमधील कुंदनमल, तर मांडवा येथील कोठारी या मोठ्या उद्योगपतींचे बंगले सीआरझेडचे उल्लंघन केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले आहेत. आता मित्तल यांचाही राजेशाही हॉलिडे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार आहे. शिवाय इतर 580 जणांना पाठविलेल्या नोटिसीमुळे त्यांच्यावरही प्रशासनाच्या कारवाईची टांगती तलवार लटकलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here