अभिनेता समीर शर्माची आत्महत्या?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या आत्महत्या प्रकरणातून चाहते सावरले नसतानाच आणखी एका टीव्ही अभिनेत्याने आयुष्य संपवले. ‘क्योंकि सास भी कभी बहू’, ‘कहानी घर घर की’ सारख्या मालिकांतून प्रसिद्ध झालेला अभिनेता समीर शर्माचा मृतदेह राहत्या घरी सापडला. समीरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे.

मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या राहत्या घरात समीरने पंख्याला लटकून गळफास घेतला. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केल्याची शंका आहे. चिंचोली बंदर भागात नेहा बिल्डिंगमध्ये अभिनेता समीर शर्मा राहत होता. समीर फेब्रुवारी महिन्यापासून इथे भाड्याने घर घेऊन एकटा राहत होता. समीरने फोन न उचलल्यामुळे त्याच्या पत्नीने मित्रांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने तपासले असता समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

समीरच्या मृतदेहाची अवस्था वाईट असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्याच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मालाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. समीरने ‘ये रिश्तें हैं प्यार के’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर-घर की’, ‘वो रेहने वाली महलो की’ यासारख्या 14 मालिकांमध्ये काम केले आहे. ‘हसी तो फसी’ या सिनेमातही तो झळकला होता.