घरमहाराष्ट्रसार्‍यांच्या नजरा आदित्य ठाकरेंवर

सार्‍यांच्या नजरा आदित्य ठाकरेंवर

Subscribe

दक्षिण मुंबई मतदारसंघ,दक्षिण मुंबई मतदारसंघात यंदा जैसे थे परिस्थिती

मुंबईसह राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता इच्छुकांच्या मुलाखतीचा धडाका सुरू झाला आहे. पण मुंबईसह सार्‍यांचे लक्ष हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर लागले आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे या मतदारसंघापैकी वरळी किंवा शिवडी या मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघावर सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. विशेष म्हणजे, सध्याची स्थिती लक्षात घेता या ठिकाणी वरळी आणि शिवडीत शिवसेनेचे आमदार आहेत. तर कुलाबा आणि मलबार हिल परिसरातदेखील भाजपाचे दोन आमदार असून उर्वरित मुंबादेवी आणि भायखळा परिसरात काँग्रेस आणि एमआयएमचे आमदार कार्यरत आहेत. त्यामुळे यंदा कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी लक्षात घेता यंदा दक्षिण मुंबईत ‘जैसे थे’ परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे अरविंद सावंत हे निवडून आले होते. विधानसभा निहाय त्यांचे मताधिक्य लक्षात घेता सध्या ज्या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत, त्याठिकाणी त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे त्यांचा विजय सहज शक्य झाला होता. ज्यात प्रामुख्याने वरळी मतदारसंघाचे नाव आघाडीवर आहे. वरळी मतदारसंघात त्यांनी यंदा ७८ हजार ६५३ मते मिळाली होती. त्याच तुलनेत काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना ४२ हजार ४९९ मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना सुमारे ३६ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. या मताधिक्याच्या जोरावरच सध्या या ठिकाणी शिवसेनेकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.

- Advertisement -

मुख्य म्हणजे, या मतदारसंघात विरोधक म्हणून सचिन अहिर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांनीदेखील यंदा शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेने आपला मार्ग सुकर करुन घेतला आहे. वरळीप्रमाणेच येथील शिवडी या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेला ९० हजारांहून अधिकची मते मिळाली होती. पण यंदा विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी मनसेदेखील निवडणूक लढणार असून त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांचे नाव चर्चेत असले तरी येथून इच्छुकांची भाऊगर्दी कमी नाही. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांचे नाव याठिकाणी चर्चेत आहे. या दोन्ही महत्वाच्या मतदारसंघांनंतर मलबार हिल या मतदारसंघात महायुतीला चांगले मताधिक्य मिळाले होते. सुमारे ९९ हजार २६९ इतकी मते या ठिकाणाहून पारड्यात पडली होती. त्यामुळे विद्यमान आमदार आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना या ठिकाणाहून पुन्हा संधी मिळणार हे मात्र नक्की मानले जात आहे.

दरम्यान, एकीकडे काही मतदारसंघात शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले असले तरी भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघात युतीचा मार्ग सोपा नाही. याठिकाणी भायखळा मतदारसंघात एमआयएम पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा वारिस पठाण यांना संधी दिली जाणार आहे. तर शिवसेनेकडून या मतदारसंघासाठी यशवंत जाधव यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपाचे मधू चव्हाण हे इच्छुक असल्याने याठिकाणी कोणाला संधी मिळते, हे पाहणे उत्सकुतेचे ठरणार आहे. तर काँग्रेसकडून पुन्हा एकदा मधू चव्हाण यांच्यावर विश्वास दाखविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा चुरस पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला ७५ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्या तुलनेत अरविंद सावंत ४७ हजार ६२७ यांच्या नावावर इतकीच मते होती. तर मुंबादेवी मतदारसंघासाठी यंदाही जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार अमिन पटेल यांच्या विरोधात भाजपकडून पुन्हा एकदा गुजराती कार्ड वापरले जाणार असल्याची शक्यता आहे. त्यानुसार उतल शहा यांचे नाव याठिकाणी चर्चेत असून मनसे फॅक्टर या ठिकाणी चालण्याची शक्यता आहे. तर कुलाबा मतदारसंघातून काँग्रेसकडून भाई जगताप यांचे नाव इच्छुकांच्या यादीत आहे. तर सध्याचे विद्यमान आमदार राज पुरोहित यांना संधी दिली जाणार आहे. लोकसभेची आकडेवारी लक्षात घेतली तर या ठिकाणी जोरदार लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत कुलाबा मतदारसंघातून शिवसेनेला ६४ हजार ५१५ मते मिळाली होती. त्या तुलनेत काँग्रेसला ४६ हजार ३७८ इतकी मते मिळाली होती. त्यामुळे यंदा विधानसभेत इथे नेमकी कोणती परिस्थिती राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -