पाटबंधारे विभागाचे अ‍ॅडलॅबशी साटेलोटे !

कलोते धरणातून पुन्हा पाणी चोरी ,नागरिकांचा उपोषणाचा इशारा

खालापूरतालुक्यातील कलोते धरण कोरडे पडायला लागल्याने पाणी टंचाईचे ढग गडद झाले असतानादेखील अ‍ॅडलॅब थीम पार्कला या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. पाटबंधारे विभागाला हाताशी धरून अ‍ॅडलॅबने पाणी चोरीस पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी धरण पात्रात बसून उपोषणाचा इशारा दिला आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी तहसीलदार इरेश चप्पलवार यांना दिले आहे.कलोते मोकाशी धरण प्रामुख्याने सिंचनासाठी असून सध्या पाच गावांची पाणी योजना या धरणावर अवलंबून आहे. धरणात अवघा पंधरा टक्केे पाणी साठा शिल्लक असून पावसाने ओढ दिल्यामुळे धरण कोरडे पडत आहे. असे असताना देखील मनोरंजन पार्क असलेले अ‍ॅडलॅब थेट धरणातून पाणी उपसा करीत आहे. याबाबत मध्यंतरी कलोते ग्रामस्थांनी अ‍ॅडलॅब पंप हाऊसला टाळे ठोकले होते. परंतु पुन्हा पाटबंधारे विभागाला हाताशी धरून अ‍ॅडलॅबने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेवर झाला आहे.धरणातून कालव्यात पाणी सोडल्यास खालापूरचा पाणीपुरवठा सुरळीत राहतो. परंतु पाणी पातळी खालावल्याचे सांगत पाटबंधारे विभाग कालव्यात पाणी सोडत नाही. त्यामुळे चार-चार दिवस खालापूरला पाणीपुरवठा होत नाही. लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आर. डी. चव्हाण यांनी धरण पन्नास टक्केे भरल्याशिवाय अ‍ॅडलॅबला पाणी पुरवठा करणार नाही, असा शब्द तहसीलदारांसमोर दिला होता. परंतु त्याचा विसर त्यांना पडल्याने धरण पात्रात उपोषणाचा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

सात दिवसांत पाटबंधारे विभाग दिलेल्या शब्दाला जागला नाही तर धरणात बसून उपोषण करणार आहे. तसे पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनादेखील पाठविणार आहे. –प्रशांत पाटील, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता

खालापूर नगरपंचायतीच्यावतीने देखील तहसीलदारांना निवेदन देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती राहुल चव्हाण यांनी दिली. त्यामुळे पुढील दिवसात कलोते धरण पाणी प्रश्नाची धग वाढणार आहे.कोलाड मुख्य कार्यालयातून निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करू. धरणात सध्या पुरेसा पाणी साठा नाही ही बाब खरी आहे. आर. डी. चव्हाण, शाखा अभियंता, भिलवले