४५ टक्क्यांमध्ये घ्या इंजिनियरिंग, फार्मसीला प्रवेश

इंजिनियरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीला किमान ५० टक्क्यांची अट होती. मात्र आता ती पाच टक्क्यांनी कमी करून ४५ टक्के करण्यात आली आहे.

vocational study

इंजिनियरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीला किमान ५० टक्क्यांची अट होती. मात्र आता ती पाच टक्क्यांनी कमी करून ४५ टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची संधी आता अधिक विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट ४० टक्के इतकी करण्यात आली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असला तरी इंजिनियरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बारावीला किमान ५० टक्के गुण असणे अपेक्षित आहे. इंजिनियरिंगसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये ५० टक्क्यांची अट होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांपासून वंचित राहावे लागत होते. परिणामी अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी परराज्यामध्ये जात होते. त्यामुळे कर्नाटकसह अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा ही अट शिथील करण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली जात नव्हती. मात्र नुकतेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे करायचे याबाबत राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले. यामध्ये इंजिनीरिंग पदवी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. नव्या निकषांनुसार पाच टक्के सवलत देण्यात आली आहे. इंजिनियरिंग सोबतच अन्य फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, विधी पाच वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही ५० व ४५ टक्क्यांवरून ४५ व ४० टक्के करण्यात आली आहे. यामुळे कमी गुण मिळणार्‍या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र दरवर्षी रिक्त राहणार्‍या हजारो जागा भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची टीकाही शिक्षण वर्तुळातून होऊ लागली आहे.