घरमहाराष्ट्रशासनाच्या जाहिरातींचा कळस !

शासनाच्या जाहिरातींचा कळस !

Subscribe

 एकाच योजनेचे 50 फलक ,जनजागृती की उधळपट्टी

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी शासकीय योजनांची वारेमाप प्रसिद्धी करण्याचा धडाका लावण्यात आला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वीच अनेक विभागांच्या जाहिराती ठिकठिकाणी झळकू लागल्या आहेत. काही ठिकाणी जाहिरातींनी कळस गाठला असून मुंबई-गोवा महामार्गावरील एसटी बस स्थानकात प्रधानमंत्री आवास योजनेचे किमान 50 फलक लावण्याचा पराक्रम करण्यात आला आहे. ही जनजागृती म्हणायची की जनतेच्या पैशांची उधळपट्टी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होईल. तत्पूर्वी प्रशासकीय कामांनादेखील वेग आला आहे. आचारसंहिता लागल्यानंतर सर्व कामे थांबणार असल्याने हा वेग वाढला आहे. यामध्ये शासनाचे विविध विभाग मागे राहिलेले नाहीत. विभागाच्या योजनांची माहिती जाहिरातींतून दिली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या एसटी बस स्थानकावर दोनच दिवसांपूर्वी एकाच योजेनेच्या माहितीचे जवळपास 50 फलक लावण्यात आले आहेत. स्थानकाच्या दुरवस्था झालेल्या भागात आणि शेडमध्ये हे फलक लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती असलेले साधारण 12 चौरस फुटाचे हे फलक आहेत. महाड आणि इंदापूर बस स्थानकात हे फलक लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. महाडसह इंदापूर, अलिबाग, श्रीवर्धन आदी एसटी बस स्थानकात हे फलक लावण्याचे आदेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे हे फलक मोडकळीस आलेल्या इमारतींवर, उगवलेल्या गवताच्या परिसरात ठोकण्यात आले आहेत. यामुळे योजनेची माहिती सर्वसामान्यांना मिळण्याऐवजी बस स्थानकाचा परिसर बकाल झाला आहे.

एसटी विभागाच्या जाहिरात विभागाने याबाबत पत्रान्वये कळवले आहे. जाहिरातींशी संबंधित एजन्सीने हे फलक लावले आहेत.
-ए. पी. कुलकर्णी, आगार प्रमुख, महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -