घरलोकसभा २०१९खडाजंगीसुप्रियांपुढे बाबाराजे जाधवराव

सुप्रियांपुढे बाबाराजे जाधवराव

Subscribe

बारामती काबीज करण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावणार्‍या भाजपला अखेर या मतदारसंघात उभा करण्यासाठी उमेदवार सापडला आहे. मनसेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपने सुरू केला आहे. माजी मंत्री असलेल्या दादा जाधवराव यांचे ते पुत्र असल्याचा फायदा या मतदारसंघात होईल, असा होरा भाजपचा आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत खलबते सुरू होती. अखेर बुधवारी बाबाराजे यांनी मनसेतील आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मुंबईला रवाना झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्काचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत पवारांना चित करण्याची भाषा भाजपचे नेते निवडणूक जाहीर होण्याआधीपासून करत आहेत. सुरूवातीला या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी निवडणूक लढवण्याची मागणी करत बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्याची मागणी भाजपकडे केली होती. मात्र भाजपने त्यांना आजवर अंधारातच ठेवले. आता जाधवराव यांच्या रुपाने नवा उमेदवार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. जाधवराव हे मनसेचे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. पुरंदरमध्ये जाधवराव यांची चांगली पकड आहे.

- Advertisement -

जाधवराव यांचे वडील दादा जाधवराव यांनी पंचवीस वर्षाहुन अधिक काळ तालुक्यात सत्ता आणि वर्चस्व ठेवले होते. त्यांचे वारस असलेले बाबाराजे यांना उमेदवारी देण्यात आल्यास राष्ट्रवादीला ती मोठी डोकेदुखी ठरू शकेल, असे भाजप नेत्यांना वाटते. उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसू लागताच जाधवराव यांनी मनसेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा देण्याची तयारी केली आहे.

मागील निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने महादेव जानकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना जानकर यांनी कडवी लढत दिली होती. जानकर यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली असती तर या मतदारसंघातील चित्र वेगळे दिसले असते असे विश्लेषण मागील लोकसभा निवडणुकीनंतर केले गेले होते. बाबाराजे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न भाजपचे काही नेते करीत आहेत. बुधवारी बाबाराजे आणि त्यांचे समर्थक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -