कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यास स्वीकारणार नाही – मुख्यमंत्री

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यास स्वीकारणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत राज्याला संबोधित करताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन दिलं. अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं. याशिवाय, ‘जे विकेल ते पिकेल’ धोरणासाठी जनजागृती सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी कायद्यांवर भाष्य केलं. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यास स्वीकारणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नाशिक आणि त्या परिसरात महा ऑनियन म्हणजे कांद्याची साठवणूक व्हावी यासाठी महाऑनियन प्रोजेक्ट राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यंनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जे विकेल ते पिकेल यावर भर देताना कृषी कायद्यांवर भाष्य केलं. “केंद्र सरकारने जे कृषी धोरण मंजूर केलेलं आहे. त्याचे फायदे किंवा त्याचे फटके आपल्याला काय बसतील? त्याबद्दल देखील विचार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं काय? हे पाहिलं जात आहे. माझं असं म्हणणं नाही की सगळचं काही बरोबर किंवा चुकीचं आहे. जे बरोबर असेल त्याचा जरूर आम्ही स्वीकारू. पण जर अयोग्य असेल आणि जर कुठे शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडणार असेल, तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही. हे आपल्या राज्याचं धोरण आहे. आम्ही जे करू ते जनतेच्या हिताचं करू, शेतकऱ्यांच्या हिताचं करू. उगाचच काहीतरी कायदा आला आहे, म्हणून तो जसाच्या तसा लागू करणार नाही. चांगला असेल तर आनंदच आहे. पण जर का तसा नसेल तर मात्र या सर्व संघटनांशी आम्ही चर्चा करत आहोत. त्यांच्याकडून विविध सूचना येत आहेत. काही आक्षेप आहेत. काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे, यावर देखील विचार केला जात आहे. त्या सर्वांशी बोलून मग आपण या कृषी धोरणाबद्दल बोलूयात.” असं मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

निसर्ग च्रकीवादळ कोकणात येऊन गेलं. पूर्व विदर्भात पूरपरिस्थिती गंभीर होती. या ठिकाणी आवश्यक ते सर्व काम आपण करत आहोत. पंचनामे जवळपास झाले आहेत. निसर्ग चक्रीवादाळाची मदत आपण बऱ्यापैकी दिली आहे. पूरपरिस्थितीबद्दलही सांगली, कोल्हापूर प्रमाणे आपण नुकसानभरपाई देत आहोत. तरी देखील त्याच्यानंतर सततच्या पावसामुळेही अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जी काही पिकं येतील ती येऊ द्या, शेतकऱ्यांनो निश्चिंत राहा, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. सर्व पिकांबाबत आपण खबरदारी घेत आहोत. सर्व ठिकाणी पंचनामे सुरू असून यथोयोग्य जी काही नुकसान भरपाई आहे, ती सरकार देत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.