‘अ‍ॅग्रोव्हिजन’चा दशकपूर्ती सोहळा २३ नोव्हेंबरपासून

विदर्भातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोव्हिजन २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे.

Nagpur
agrovision nagpur
प्रातिनिधिक फोटो

विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम व शेतकºयांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन दहावे अ‍ॅग्रोव्हिजन २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता दहाव्या अ‍ॅग्रोव्हिजनचे उद्घाटन होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री व प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी पत्रपरिषदेत दिली.

विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून अ‍ॅग्रोव्हिजनला सुरुवात झाली, असे गडकरींनी सांगितले. अल्पावधीतच हे मध्ये भारतातील सर्वांत मोठे प्रदर्शन बनले आहे. यंदा दशकपूर्ती वर्षानिमित्त अधिक भव्य स्वरूपात दहाव्या अ‍ॅग्रोव्हिजनचे आयोजन होणार आहे. कृषिज्ञान, तंत्रज्ञान, प्रशिक्षणाचे सीमोल्लंघन ठरणाºया कार्यशाळा, राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषीविषयक ताज्या विषयांवरील चर्चासत्र, विदर्भाच्या शेतीला नवी दिशा देणाºया परिषदांसोतबच भव्य पशुप्रदर्शन अ‍ॅग्रिथॉन आणि बळीराजाच्या गौरवाचा अ‍ॅग्रोव्हिजन अवॉर्ड ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये राहणार असल्याचेही गडकरी म्हणाले. पत्रपरिषदेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संयोजक डॉ. गिरीश गांधी, आयोजन सचिव रवी बोरटकर, आयोजन सचिव रमेश मानकर, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, सुलेखा कुंभारे आदी उपस्थित होते.

सुमारे २५ हून अधिक कार्यशाळा

अ‍ॅग्रोव्हिजनचे प्रमुख आकर्षण असलेल्या कार्यशाळांमध्ये यंदा उत्पादन तंत्रज्ञान, शेतीपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वायदेबाजार यांसारख्या बाजार सुविधा आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. २५ हून अधिक विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विदर्भातील यशस्वी शेतकºयांच्या यशोगाथांपासून प्रेरणा घेण्याची संधी यातून शेतकऱ्यांना मिळेल.

एकदिवसीय परिषदा

दहाव्या अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये विदर्भाच्या कृषी विकासाला चालना मिळावी, यासाठी एनडीडीबीच्या सहयोगाने २४ नोव्हेंबर रोजी ‘विदर्भातील दुग्धव्यवसायाचा विकास’, २५ नोव्हेंबर रोजी ‘बांबू उत्पादन व संधी’ या विषयांवर एकदिवसीय परिषदा होणार आहेत. दुधाळू जनावरांचे संगोपन करणाऱ्या शेतकºयांची व्यवसायवृद्धी आणि विदर्भात उत्तम उत्पन्नाची संधी असणाऱ्या बांबू पिकांबद्दल सखोल चर्चा होणार आहे.

भव्य कृषिमंथन

अ‍ॅग्रोव्हिजनच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने भव्य पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माफ्सू व पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने अधिक भव्य स्वरूपात यावर्षीही जातिवंत जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.