दादा तुमच्या मेहेरबानीमुळेच मंत्री झालो – जयदत्त क्षीरसागर

शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळू शकले नाही, पण काही का असेना आमच्यातून गेलेल्या क्षीरसागर यांना तरी मंत्रीपद मिळाले, असा टोला अजित पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांना लगावला आहे.

Mumbai
ajit pawar and jaydatta kshirsagar
अजित पवार आणि जयदत्त क्षीरसागर

“मला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, ही अजितदादांची मेहेरबानी आहे”, असा खुलासा नवनियुक्त कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी आज विधानसभेत केला. अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळू शकले नाही, पण काही का असेना आमच्यातून गेलेल्या क्षीरसागर यांना तरी मंत्रीपद मिळाले, असा टोमणा मारला. त्यानंतर संतापलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी थेट अजित पवार यांनाच सभागृहात लक्ष्य केले.

अजित पवारांची शिवसेनेवर टीका 

शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षिरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे. त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या असा खोचक प्रश्न अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना विचारला. तसेच अनेक आमदार खासगीमध्ये नाराजी व्यक्त करत असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. अजित पवार यांच्या या शाब्दिक बाणानंतर क्षीरसागरही चांगलेच संतापले. त्यांनीही मग अजित पवार यांच्यावर शरसंधान साधले.

अजित पवारांचे मानले आभार

‘माझी राष्ट्रवादीत घुसमट होत होती. मला बाहेर पडायचे होते. ती संधी मला अजित पवार यांच्यामुळेच मिळाली. त्यामुळे मी बाहेर पडलो आणि शिवसेनेने मला मंत्रीपद दिले. याबद्दल अजितदादांचा आभारी’, असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यावर अजित पवार यांनी पुन्हा शाब्दिक कोटी करत माझ्यामुळे दुसऱ्या पक्षातील कुणाला तरी मंत्रीपद मिळतेय, याचा आनंद वाटतोय, असे सांगितले.

हेही वाचा – 

शिवसेनेच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; अजित पवारांनी ठेवले वर्मावर बोट