अजित पवारांच्या शेजाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये NCP नेत्यांवर आरोप!

उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामतीमध्ये सावकारी जाचाला कंटाळून प्रीतम शाह नावाच्या एका व्यापाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधल्या घराच्या शेजारीच ही व्यक्ती राहात होती. प्रीतम शाह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांची देखील नावं आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकमतने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या प्रकरणात एकूण ९ जणांवर आरोप लावण्यात आले असून त्यातल्या ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अजूनही ३ आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे. ‘बारामतीमध्ये सुरू असलेल्या बेकायदा सावकारीच्या पडद्याआड काहीजण पैशांसाठी आपला छळ करत आहेत आणि त्यामुळेच कंटाळून मी आत्महत्या करत आहे’, असं या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्यापारी प्रीतम शाह यांच्या मुलाने पोलिसांत या ९ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये नगरसेवक जयसिंह देशमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रविण गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील आवळे, संघर्ष गव्हाले आणि मंगेश आमसे या ९ जणांची नावं आहेत. प्रीतम शाह यांना आरोपींनी व्याजावर दिलेले पैसे त्यांनी परत केले होते. मात्र, तरीदेखील जादा पैशांची मागणी आरोपींकडून केली जात होती. या मानसिक त्रासाला कंटाळूनच प्रीतम शाह यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, भाजपनं या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि सत्ताधीर शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. अर्णब गोस्वामींप्रमाणेच आता सरकार राष्ट्रवादीच्या आरोपी नेत्यांवर देखील कारवाई करेल का? असा सवाल भाजपमधून विचारला जात आहे. मात्र, ३ फरार आरोपी सापडल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत.