घरमहाराष्ट्रशरद पवारांचे नाव गोवल्यानेच राजीनामा

शरद पवारांचे नाव गोवल्यानेच राजीनामा

Subscribe

सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा, जे दुखावलेत त्यांची माफी मागतो
पवार कुटुंबांत कोणताही गृहकलह नाही, आजही शरद पवारांचाच शब्द अंतिम
शिखर बँकेच्या ठेवी १२ हजार कोटी, घोटाळा २५ हजार कोटींचा कसा
चौकशा किती वर्षे चालवायच्या, प्रकरण २०१०चे गुन्हा २०१९ला कसा
आम्हीही माणसे आहोत, आम्हालाही भावना आहेत, आम्ही कमी पडलो

राज्य सहकारी बँक प्रकरणात शरद पवारांचे नाव गोवल्यानेच आपण व्यथित झालो आहोत. शरद पवारांचा याप्रकरणाशी कोणताही संबंध नाही. फक्त अजित पवारांचा सबंध असल्याने त्यांचे नाव गोवण्यात आले. हे सगळे पाहून मी अतिशय अस्वस्थ झालो. माझ्या बुद्धीला ते पटत नव्हते. म्हणून यातून आपण बाहेर पडायला हवे. आपल्यामुळे साहेबांना या वयात बदनामी आणि त्रास सहन कराला लागतोय असे मला वाटते. त्यामुळेच कुणालाही, अगदी शरद पवार यांनादेखील न सांगता मी राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले. हे स्पष्टीकरण देताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. आपल्या कुटुंबात कुठल्याही प्रकारचा गृहकलह नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करत पवार साहेब सांगतील, तोच अंतिम शब्द असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

गेल्या तीन दिवसांपासून आधी शरद पवार आणि नंतर अजित पवार यांचीच चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी अचानक अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते गायब झाले. गेल्या १८ तासांपासून अजित पवार यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. राजीनामा दिल्यानंतर स्वत: शरद पवारांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्यांच्या गायब होण्याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात होते. अखेर शनिवारी अजित पवार यांनी या सर्व प्रकरणावर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला. माझ्या सहकार्‍यांना कळले नाही की, मी राजीनामा का दिला. त्यानंतर मी कोणालाही काहीच सांगितले नाही. आणि जर सांगितले असते तर त्यांनी मला तसे करुन दिले नसते, म्हणून मी कोणालाही कळविले नाही. माझ्या कृतीमुळे कुणाच्या भावना दुखाविल्या असतील, तर त्यांची मी क्षमा मागतो. कार्यकर्त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, विधीमंडळात याप्रकरणी ज्यावेळी चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही सगळे राज्य बँकेच्या संचालक मंडळावर होतो. पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मी केले. तिथे संचालक मंडळावर सर्वपक्षीय नेते आहेत. त्या बोर्डावर कारवाई करण्यात आली. त्या निर्णयाविषयी मला फार काही बोलायचे नाही. पण ती चौकशी सुरू असताना संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले की, १ हजार ८८ कोटी रूपयांची अनियमितता तिथे झाली.

- Advertisement -

पण माझ्याकडे आज कागदपत्रे आणि त्याची उत्तरे आहेत. तर दुसरीकडे जनहित याचिकेमध्ये २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला गेला. पण ज्या बँकेत ११ ५०० ते १२००० कोटींच्या ठेवी आहेत, तिथे २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर मागेही ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तेव्हादेखील मी अस्वस्थ झालो होतो. या प्रकरणात ५ वर्षांपासून चौकशी सुरू होती. अजूनही ती संपत नाही. आता म्हणतात २५ हजार कोटींचा घोटाळा. लोकांना वाटेल की अजित पवारला हजार कोटींशिवाय दुसरं काही सुचतं की नाही? आम्हीही तुमच्यासारखीच माणसं आहोत. आम्हालाही भावना आहेत की नाही, असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, कुणीही उठायचं आणि कुठलीही किंमत टाकायची असं कसं चालेल? आजही आम्ही सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो. बँकेच्या इतिहासापासून आजपर्यंत अनेकजण संचालक मंडळावर होते. मध्ये काही आयएएस अधिकारी देखील संचालक मंडळावर होते. या सगळ्यांच्या काळात झालेल्या व्यवहारांची माहिती घेतली तर खरी परिस्थिती समोर येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तर केसच उभी राहिली नसती
अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल म्हणून बातम्या चालवल्या जात आहेत. पण त्यात फक्त शरद पवार आणि अजित पवारांचे नाव घेतले जाते. यात अनेक पक्षांचे नेते असतानादेखील फक्त पवारांचे नाव घेतले जाते. जर संचालकांमध्ये अजित पवार हे नाव नसते, तर ही केस उभीच राहिली नसती. समोरच आली नसती. हे मी छातीठोकपणे सांगू शकतो, असे अजित पवार म्हणाले.

गृहकलह नाही
गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरात कलह असल्याचे दावे केले जात आहेत. हे दावे यावेळी अजित पवार यांनी फेटाळून लावले. आजही शरद पवार सांगतील, ते आम्ही ऐकतो. उगीच गृहकलह म्हणून कशाला आमच्या घरात भांडणे लावत आहात? मी राजकारणात आलो. सुप्रिया आली. पार्थ आला. आता रोहीत आला. त्याच्या नावानेदेखील गृहकलह असल्याचे बोलले जात आहे. पण तसे काहीही नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कुटुंबप्रमुख या नात्याने शरद पवार जे सांगतात तेच ऐकले जाते आणि त्याप्रमाणे केले जाते, हे त्रिवार सत्य असल्याचे मत अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत सिल्व्हर ओकवर
दरम्यान, अजित पवार यांनी शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्वांचे लक्ष्य हे शरद पवारांचे निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’कडे लागले होते. त्यातच शिवसेना नेते आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी सिल्व्हर ओक गाठल्याने अनेकांच्या भुवया उंचविल्या. या भेटीत त्यांनी तब्बल अर्धा तास पवारांशी चर्चा केली. दरम्यान, ‘मी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करण्यासाठी गेलो होतो’, असे संजय राऊत यांनी जाहीर करत या भेटीवरुन सुरू झालेली चर्चा थांबवली.

मन विषन्न झालं म्हणून कोणी राजीनामा देते का? – मुनगंटीवार

अजित पवारांच्या राजिनाम्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोपरखळी मारली. मन विषन्न झाल्याने कोणी राजीनामा देतं का? असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला. जनतेची कामे करण्यासाठी तुम्ही आमदार झाला आहात. त्यामुळे मन विषन्न झाल्याने राजीनामा देणे योग्य नाही. शिखर बँक प्रकरणी अजित पवारांवरील कारवाईत राज्य सरकारचा काहीही संबंध नाही, ही कुठल्याही प्रकारे सुडाची कारवाई नाही. यामध्ये केवळ मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. याप्रकरणी तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे ही आकडेवारी मांडली गेली आहे. त्यावर हायकोर्टाने हे खरं आहे की नाही हे तपासण्यासाठी एफआयर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. कोर्टाच्या या आदेशाचे पालन केवळ राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे ही सरकारने स्वतःहून केलेली सुडाची कारवाई नाही.

…आणि दादांना अश्रू अनावर
राजीनाम्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार हे भावूक झालेत. मागेही ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तेव्हादेखील मी अस्वस्थ झालो होतो. या प्रकरणात ५ वर्षांपासून चौकशी सुरू होती. अजूनही ती संपत नाही. आता म्हणतात २५ हजार कोटींचा घोटाळा. लोकांना वाटेल की अजित पवारला हजार कोटींशिवाय दुसरं काही सुचतं की नाही? आम्हीही तुमच्यासारखीच माणसं आहोत. आम्हालाही भावना आहेत की नाही..हे सांगताना भाषण थांबविले खरे. पण त्यांना यावेळी भावना अनावर झाल्या आणि रडू कोसळले.

स्वच्छ झाले..चांगले झाले…
सकाळी शरद पवार यांना भेटल्यानंतर राजीनाम्याचे कारण स्पष्ट करण्यासाठी दुपारी अजित पवारांनी पत्रकार परिषद बोलविली. या परिषदेत आपली भूमिका मांडल्यानंतर ते भावनिक झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांना धीर दिला. अजित पवारांनी आपली भूमिका मांडल्यानंतर शेजारीच बसलेल्या छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना धीर दिला. स्वच्छ झाले…छान झाले…चांगले झाले…अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना शाब्दिक आधार दिला.

चिंतेचे कारण नाही…
४८ तासांपासून अदृश्य असलेले अजित पवार अखेर शनिवारी दुपारी १२च्या सुमारास शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रकट झाले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याआधीच शरद पवार सकाळी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. तिथेच सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार देखील उपस्थित होते. यावेळी फक्त पवार कुटुंबीयच सिल्व्हर ओकमध्ये उपस्थित होते. यावेळी पवार कुटुंबीयांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. त्यानंतर आधी अजित पवार आणि नंतर शरद पवार सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले. मात्र, शरद पवार यांनी यावेळी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. ‘जे काही असेल, ते सगळं अजित पवार पत्रकार परिषदेत सांगतीलच. मी फक्त इतकंच सांगेन की चिंतेचं काहीही कारण नाही’, असे शरद पवार म्हणाले आणि राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -