घरमहाराष्ट्र...तर मला कपडे काढून जावं लागेल - अजित पवार

…तर मला कपडे काढून जावं लागेल – अजित पवार

Subscribe

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी वीजमाफीचा प्रस्ताव भर सभेत मांडला होता. त्यावर अजित पवारांनी 'सगळंच जर माफ करायला लागलो तर कपडे काढून मला जावे लागेल. त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायचं', असा टोला लगावला.

आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात वीजबिल माफीच्या मागणीवरून टोलेबाजी केली आहे. ‘सगळंच माफ करायला लागलो, तर मला कपडे काढून जावं लागेल, त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढंच करायचं’, असा टोला अजित पवारांनी लगावला. पुण्यातील जुन्नर येथे शिवप्रेमींचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता, तेव्हा ते बोलत होते. ‘शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आल्यानंतर, सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन मंत्रिमंडळात काम करत आहेत. या सर्वांना एकत्र घेऊन राज्यामध्ये शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीतरी शिकण्याची आणि बोध घेण्याची गरज आहे’, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

राज्यातील जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही

‘राज्यात महागाई, बेरोजगारी गंभीर होत चालली असताना, सर्वसामान्यांना जगणं महाग झालं आहे. राज्यात एनआरसीच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्चे काढले जातात हे दुर्दैवी आहे. जनतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याऐवजी दुसरेच मुद्दे पुढे आणले जातात. यामधून जातीय वाद निर्माण करून तेढ निर्माण होण्याची भिती आहे’, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. ‘राज्यातील जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही. CAA आणि NRC संदर्भात राज्यात गैरसमज निर्माण करू नये. जोपर्यंत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, तोपर्यंत राज्यातील जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही’, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

- Advertisement -

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मदत

‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दोन लाखांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असून, त्यासंदर्भातली माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. आजच त्यावर निर्णय घेणार असून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. जे शेतकरी नियमित कर्ज भरत असतात त्यांच्यासाठीही चांगल्या पद्धतीची मदत करू’, असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -