प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी घरे – मुख्यमंत्री

सोलापूर येथील श्रमिक पत्रकारांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात २३८ सदनिका बांधकामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Solapur
cm devendra fadanvis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

”पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोलापूर येथील श्रमिक पत्रकारांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात २३८ सदनिका बांधकामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण व वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ”पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेच्या माध्यमातून निश्चितच दिलासा मिळेल.” मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ”राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील पत्रकारांना होईल. ११०० आजारांवर या योजनेच्या माध्यमातून उपचार मिळणार आहेत.”

हेही वाचा – निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत सरकार प्रयत्नशील

”सोलापूर श्रमिक पत्रकार संघाला गौरवपूर्ण इतिहास आहे. पत्रकार संघाने समाजजागृतीचे मोठे कार्य केले आहे. सोलापूर पत्रकार संघाच्या रुपाने महाराष्ट्रात गृहनिर्माणाची ही पहिली योजना आज कार्यान्वित झाली. त्यामुळे पुढच्या योजना नक्कीच सुकर होतील. सोलापूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी योजना करणार,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here