घरमहाराष्ट्रविद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर गप्प बसणार नाही

विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर गप्प बसणार नाही

Subscribe

दाभोलकर, गौरी लंकेश यांना ठार मारण्यात आले ती कोणती भारतीय संस्कृती आहे, विद्यार्थ्यांना मारहाण करणे हे कोणत्या संस्कृतीत बसते, असे प्रश्न उपस्थित करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी दिला.

शुक्रवारी सकाळी ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनला सुरुवात झाली. मात्र पाठदुखीच्या त्रासामुळे दिब्रिटो ग्रंथ दिंडीत उपस्थित राहिले नाहीत. संध्याकाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला मात्र ते व्हिल चेअरवर बसून हजर होते. संमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहित्य संमेलनाची सूत्रंही प्रदान केली. त्यानंतर संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी फ्रान्सिस दिब्रिटो देशातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले.जेएनयूमधील विद्यार्थी हल्ल्यात जखमी झाले. अशा घटनांबाबत गप्प बसणार नाही. आजचे प्रश्न कोणते? असा मला प्रश्न पडतो. देशात वाढत चाललेली बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग आणि ढासळत असलेली अर्थव्यवस्था हे मुख्य प्रश्न आहेत असं म्हणत त्यांनी याबाबतची खंतही व्यक्त केली. मी एकदा जर्मनीला गेलो होतो. तिथल्या नागरिकांना मी विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की होय एक काळ जेव्हा आम्ही हिटलरच्या धुंदीत होतो. तशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते, असे दिब्रिटो म्हणाले.

- Advertisement -

मी प्रभू येशूचा उपासक आहे, प्रभू येशू म्हणतात की त्यांना माफ कर ज्यांना माहित नाही ते काय करत आहेत. माझी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेकजण माझा सत्कार करण्यासाठी आले. मी त्यांना सांगितले हा खर्च टाळा. मी साहित्याच्या मंदिराच्या पायरीजवळ दिवे लावणारा छोटासा सेवक आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यांना सांगा हे आश्वासन लवकरात लवकर पाळा अन्यथा ही मंडळी तुमचे ऐकणार नाहीत, असा इशारा दिब्रिटो यांनी दिला.

मला गौतम बुद्ध वाचून आयुष्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळे आपण प्रगल्भ होतो. आपल्या वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. अनेक पालकांना आजच्या घडीला वाटते की इंग्रजी ही धनाची भाषा आहे. ती धनाची भाषा असेल पण लक्षात ठेवा मराठी ही मनाची भाषा आहे, असे दिब्रिटोे म्हणाले. मी संतांना मानणारा माणूस आहे. संतांना मी कधीही विसरु शकत नाही खासकरुना माझ्या लाडक्या तुकोबांना, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -