आघाडीच्या जागा वाटपाला मुहूर्त

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी २० ,समविचारींना आठ जागांची तयारी

Mumbai
Congress, NCP

आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना समान म्हणजे २० इतक्या जागांचे वाटप करण्यास दोन्ही काँग्रेस पक्षांमध्ये एकमत झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘महानगर’ला सांगितले. ताकदीचा अंदाज घेण्याऐवजी ४८ जागांपैकी दोन्ही पक्षांनी ४० जागांवर निवडणूक लढवायची आणि ऊर्वरित आठ जागा समविचारी पक्षांना देण्याची तयारी या दोन्ही पक्षांनी केली असल्याचे सांगण्यात आले. समविचारी पक्षांना द्यायच्या जागांबाबत स्पष्टता नसली तरी आठ जागा त्या पक्षांना राखून ठेवण्यासही दोन्हीकडून संमती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. २०१४च्या निवडणुकीवेळी दोन्ही काँग्रेस पक्षांनी काँग्रेसने 27 तर राष्ट्रवादीने 21 जागा लढवल्या होत्या. महाराष्ट्रातून काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचे पाच खासदार निवडून आले. विधानसभेत राष्ट्रवादीचे 41 तर काँग्रेसचे 42 आमदार आहेत. त्यातही नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेस सोडल्यात जमा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा जोर वाढल्याचा दावा केला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळविल्या. त्यामुळे राष्ट्रवादीने लोकसभेच्या निम्म्या जागांवर दावा केला आहे. मात्र काँग्रेस तेवढ्या जागा सोडायला तयार नाही. मात्र देशातील विरोधकांना भाजपविरोधात एकत्र करण्याची जबाबदारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सूत जमले आहे. यामुळेच महाराष्ट्रात अधिक ताणून न धरता समेट घडवा, अशा सूचना राहुल गांधींकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नव्याने दोन्ही काँग्रेसने ४८ पैकी प्रत्येकी वीस जागा वाटून घ्याव्यात, यात मुंबई आणि पुण्याची जागा ताब्यात घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. मात्र मागणीचा अतिरेक नको, असे बजावत पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. बारामती, शिरूर, मावळ या तीन जागा ताब्यात असताना पुण्यासाठी आग्रह कशाला, अशी विचारणा पवारांनी केल्याचे कळते. पुण्यात काँग्रेस देईल त्या उमेदवाराला विजयी करायचे आहे, अशा सूचनाही पवारांनी दिल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस आघाडीत बहुजन विकास आघाडीला घेण्याची तयारी पवारांनी सुरू केली आहे. तसे झाल्यास पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला सोडण्याची तयारीही आघाडीची आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमएमआय या पक्षाशी केलेली युती काँग्रेसला रुचलेली नाही.

शिवाय आंबेडकर हे सातत्याने शरद पवार यांच्यावर करत असलेल्या टीकेमुळे आघाडीत आंबेडकरांना किती स्थान मिळेल, हे गुलदस्त्यात आहे. मात्र तरीही एक पाऊल मागे घेत या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक या प्रमाणे जागा सोडता येईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी घेतली आहे. अकोल्याची जागा आंबेडकरांना तसेच विदर्भातील एक जागा मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला, नॅशनल रिपब्लिकन या नव्या पक्षाला शिर्डीची तर मावळची जागा शेकापला सोडायची तयारी आघाडीने दर्शवली आहे. याशिवाय मुंबईतील एखादी जागा समाजवादी पक्षाला सोडता आल्यास आघाडीची मतं विभागणी टळेल, असा विश्वास दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here