घरमहाराष्ट्रएकादशीला यान सोडल्यामुळं अमेरिकेची चांद्रमोहीम फत्ते; संभाजी भिडेंचा युक्ती'वाद'

एकादशीला यान सोडल्यामुळं अमेरिकेची चांद्रमोहीम फत्ते; संभाजी भिडेंचा युक्ती’वाद’

Subscribe

चांद्रयान मोहिम यशस्वी करणाऱ्या अमेरिकेने भारतीय कालमापन पद्धतीचा वापर करुन एकादशीला यान उडवल्यामुळे त्यांची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याचा अजब दावा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला आहे. “अमेरिकेने ३८ वेळा चंद्रावर यान उतरवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते ३८ प्रयत्न फसले. त्यानंतर त्यांनी भारतीय कालमापन पद्धतीचा वापर केला. ३९ व्या प्रयत्नात एकादशीला यान सोडल्यामुळे अमेरिकेचा प्रयत्न यशस्वी झाला”, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी सोलापूर येथे केले आहे.

संभाजी भिडे म्हणाले की, “एक सेकंदाचा हजारावा हिस्सा मोजण्याची आपली कालमापन पद्धत आहे. एकादशी हा दिवस असा आहे की त्यादिवशी विश्वातील सर्व नक्षत्रांची स्थिती अतिशय संतुलित असते. जगभरात जी याने सोडली जातात ती भारतीय कालमापन पद्धतीनेच सोडली जातात. त्यामुळेच भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही.” असा दावा त्यांनी केला आहे. नवरात्रीत शिवप्रतिष्ठानच्यावतीने राज्यभरात दुर्गामाता दौडही आयोजित केली जाणार आहे. यासाठी ते सोलापूर येथे बैठक घेण्यास आले होते. या बैठकीत त्यांनी इस्रोच्या चांद्रयान २ या मोहीमेबद्दल भाष्य केले.

- Advertisement -

भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान २ ही मोहीम ७ सप्टेंबर रोजी अंतिम टप्प्यात असताना शेवटच्याक्षणी इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किमी अंतरावर असताना विक्रमचा संपर्क तुटल्यामुळे इस्रोसहीत सर्व भारतीयांना हळहळ वाटली. आजवर कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला नव्हता. ते धाडस इस्रो संस्थेने केले होते.

संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्ये

संभाजी भिडे यांची काही वक्तव्ये आतापर्यंत वादग्रस्त ठरली आहेत. माझ्या बागेतील आंबे खाल्यामुळे काही जोडप्यांना मुले झाल्याचा दावा त्यांनी नाशिक येथे केला होता. तर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मनु हा संत तुकाराम यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचा दावा केला होता. या दोन्ही वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच गदारोळ उडाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -