घरमहाराष्ट्रकेंद्राकडून महाराष्ट्राला कोणताही निधी नाही

केंद्राकडून महाराष्ट्राला कोणताही निधी नाही

Subscribe

फडणवीसांच्या आरोपांचे ठाकरे सरकारकडून खंडन

मुंबई- करोनाच्या आणि आर्थिक आणीबाणीच्या काळात केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरघोस मदत दिल्याचे मोठे आकडे जाहीर करणार्‍या भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून अशी कोणतीही मदत मिळाली नसल्याचा पलटवार केला आहे. करोनाच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला कोणतीही विशेष मदत मिळाली नसल्याचे सांगत फडणवीस यांनी राज्य सरकारला कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये, असा टोलाही आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांनी लगावला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महागडी विकास सरकारवर विविध गंभीर आरोप केले होते. त्याबाबत आज महाविकास आघाडी सरकारमधील संसदीय व परिवहन मंत्री अनिल परब महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या आरोपांचा समाचार घेतला.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून आतापर्यंत २८ हजार कोटी रुपये मिळाले असल्याचा दावा फडणवीस यांनी काल केला होता, त्याबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी काल अभासी चित्र निर्माण केले. आकड्यांची फुगवा-फुगवी करून महाराष्ट्राची दिशाभूल केली. १७०० कोटींचा गहू अद्यापही महाराष्ट्राला मिळालेला नाही. १२२ कोटींचा स्थलांतरीत मजुरांसाठीचा निधीही अद्याप महाराष्ट्राला मिळालेला नाही. केंद्राने अशी कुठलीही वेगळी मदत महाराष्ट्राला केलेली नाही. उलट महाराष्ट्राला केंद्राकडून जीएसटीचे हक्काचे पैसेही मिळालेले नाहीत. त्यामुळे मदत न देता राज्य सरकारला कर्ज काढण्याचा सल्ला फडणवीस यांनी देऊ नये, असा टोलाही परब यांनी लगावला. श्रमिक ट्रेनच्या नियोजनात रेल्वे मंत्र्यांकडून आणि भाजपकडून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जात आहे. महाराष्ट्राला श्रमिक ट्रेन मिळत नाहीत. रेल्वेमंत्री पियुष गोयल मात्र सोशल मीडियावर ट्विटवर ट्विट करत आहेत. रेल्वेचे नियोजन नसल्याने रेल्वे स्टेशनवर गर्दी होत आहे. स्टेशनवर गर्दी व्हावी व महाराष्ट्राची बदनामी व्हावी असे चित्र निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोपही परब यांनी रेल्वे मंत्रालयावर केला. मजुरांसाठीच्या ट्रेनचे पैसेही राज्य सरकारने खर्च केले, असा दावाही परब यांनी यावेळी केला.

आघाडी सरकार स्थिर आणि भक्कम – बाळासाहेब थोरात
दोन महिने उलटून गेले. भारतावर, महाराष्ट्रावर करोनाचे संकट आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य जनजीवन थांबले आहे. उद्योग व्यवसायही बंद आहे. मात्र, राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे, एकत्रितपणे काम करत आहे. रोज ६ लाख लोकांची भोजनाची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. सध्याही करोनाचे संकट कमी झाले, असे मी मानत नाही. अशा परिस्थितीत आम्ही विरोधी पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा केली. यापुढेही करू. मात्र विरोधकांनी राज्याला अस्थिर करण्याची मोहीम उघडली आहे. आमचे लक्ष हे केवळ करोनाला घालवण्याकडे आहे महाराष्ट्राला करोना मुक्त करू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

गुजरातपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती नियंत्रणातजयंत पाटील
महाराष्ट्र, मुंबईची स्थिती हाताबाहेर गेली, असे चित्र निर्माण केले जात आहे. उलट देशात सर्वाधिक चांगले काम महाराष्ट्रात पर्यायाने मुंबईत सुरू आहे. आघाडी सरकारने वेळीच उपाययोजना केल्याने रुग्ण संख्या आता नियंत्रणात येत आहे. केंद्र सरकारने जे भाकीत वर्तवले होते, त्यापेक्षा कमी रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. दुसरे महत्त्वाचे असे की सतत असा आभास निर्माण केला जातो की महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ५० हजारांच्या पार गेली आहे. मात्र, मी इथे नमूद करू इच्छितो की, महाराष्ट्रात सध्या ३५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग आता १४ दिवसांवर गेला आहे. इथे तुलना करायची नाही, मात्र गुजरात राज्याचे उदाहरण मी येथे देत आहे. गुजरात पेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती नियंत्रणात आहे. विरोधी पक्षाने अंडरइस्टिमेट करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. भाजपने मुख्यमंत्री निधीत पैसे दिले नाहीत. भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -