घरमहाराष्ट्रराज्यातील रक्तपेढ्यांचा मनमानी कारभार; १०० पेढ्यांवर कारवाईचा एसबीटीसीचा निर्णय

राज्यातील रक्तपेढ्यांचा मनमानी कारभार; १०० पेढ्यांवर कारवाईचा एसबीटीसीचा निर्णय

Subscribe

रक्त संकलन, रक्त वितरण, शिल्लक साठा अशी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेला (एसबीटीसी) न कळवणार्‍या रक्तपेढ्यांवर लवकरच फास आवळण्यात येणार आहे. राज्यातील २५ ते ३० टक्के रक्तपेढ्या परिषदेला कोणत्याही प्रकारची माहिती कळवत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.

कोरोना काळामध्ये रक्त तुटवडा होऊ नये यासाठी परिषदेकडून विशेष मेहनत घेण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय संस्थांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली. त्याला रक्तदात्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे मार्च ते ऑगस्ट या कोरोनाच्या सहा महिन्यात ४ लाख ७७ हजार ६१३ युनिट रक्त संकलन झाले. मात्र प्रत्यक्षात हा आकडा अधिक आहे. राज्यामध्ये तब्बल ३४१ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांना दररोज सकाळी १० ते ११ दरम्यान त्यांच्याकडील रक्ताचा साठा राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ‘ई – रक्तकोष’ या संकेतस्थळावर अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून परिषदेसह सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या रक्तपेढीमध्ये आवश्यक रक्तसाठा आहे, याची माहिती उपलब्ध होईल आणि त्यांना गरजेच्यावेळी रक्तासाठी धावपळ करावी लागणार नाही. मात्र राज्यातील रक्तपेढ्यांपैकी २५ ते ३० टक्के म्हणजेच जवळपास ९० ते १०० रक्तपेढ्यांकडून रक्त संकलन व साठ्याची माहितीच परिषदेच्या संकेतस्थळावर अपडेट करण्यात येत नाही. त्यामुळे रक्तसाठ्यासंदर्भातील योग्य माहिती परिषदेला उपलब्ध होत नाही. रक्तसाठ्यासंदर्भातील माहिती दररोज संकेतस्थळावर अपलोड करण्यासंदर्भातील सूचना परिषदेकडून रक्तपेढ्यांना वारंवार देण्यात येत आहेत. मात्र मुजोर झालेल्या रक्तपेढ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. माहिती अपडेट करण्याबाबत इंटरनेटची समस्या, डेटा इंट्री करणारी व्यक्ती नाही अशी अनेक कारणे रक्तपेढ्यांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या नागरिकाला रक्त पुरवठा करण्यात अडचणी येतात. वारंवार सूचना करूनही रक्तपेढ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर परिषदेने रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी रक्तसाठ्याची माहिती संकेतस्थळावर दररोज अपडेट न करणार्‍या रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील सूचना त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला केल्या आहे.

- Advertisement -

रक्तपेढ्यांना दरवर्षी त्यांच्या परवानाचे नुतनीकरण करावे लागते. त्यामुळे जेव्हा रक्तपेढ्या परवाना नुतनीकरण करण्यासाठी अर्ज करतील त्यावेळी त्यांच्याकडून माहिती अपडेट करण्यात आली नसेल तर त्यांचे परवाना रद्द करण्याची विनंती परिषदेकडून अन्न व औषध प्रशासनाला केली आहे. त्यामुळे भविष्यात रक्तसाठ्याची माहिती संकेतस्थळावर दररोज अपडेट न करणार्‍या रक्तपेढीचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे.

रक्तसाठ्याची माहिती दररोज अपडेट करण्याबाबत वारंवार सूचना करूनही ९० ते १०० रक्तपेढ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई निर्णय घेत त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
– डॉ. अरुण थोरात, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -