कोकणात जाण्यासाठी एसटीची व्यवस्था

ई-पासची गरज नाही, १४ दिवसांचा क्वारंटाईन १० दिवसांवर, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांची माहिती

kokan- st- ganpati

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने एसटी बसेसची व्यवस्था केली असून त्याचे आरक्षण बुधवारपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे एसटी बसने कोकणात जाणार्‍यांना ई-पासची गरज भासणार नाही. तसेच कोकणात गेल्यावर क्वारंटाईनचा कालावधी १४ दिवसांवरून १० दिवस करण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी मंगळवारी दिली आहे.

अनिल परब यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, एसटी प्रशासनाने कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी ३ हजार बसेसची व्यवस्था केली आहे. तसेच, एसटीने जाणार्‍या प्रवाश्यांना कोणत्याही प्रकारच्या ई-पासची आवश्यकता भासणार नाही. कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनी ग्रुप बुकिंग केल्यास गावापर्यंत एसटी सोडण्याची सोयही प्रशासनाने केली आहे. यंदा मात्र, प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के एसटी चालवण्यात येणार आहेत. तसेच, कोणतेही अतिरिक्त भाडेही आकारण्यात येणार नसल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

गावाला गेल्यावर १४ दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी १० दिवसांवर केला आहे. चाकरमान्यांसाठी आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे क्वारंटाईनचा कालावधी १० दिवसांवर करण्यात आला असून १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणार्‍यांची स्वॅब टेस्ट करण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

एसटीमध्ये २२ लोकांना प्रवास करता येणार असून बस सुटल्यानंतर थेट गावातच बस थांबणार मध्ये कुठेही थांबा घेणार नाही. प्रवाश्यांना त्यांच्या जेवणाची सोय स्वतःच करावी लागणार आहे. जेवणासाठी एसटी कुठेही थांबणार नाही. तसेच, खासगी बस सेवेनेही एसटी भाड्यापेक्षा दीडपट भाडे घ्यावे, जर याबाबतच्या तक्रारी आल्यास कारवाई करण्याचा इशारा, अनिल परब यांनी दिला आहे.

बुकिंग करता येणार
बुधवारपासून एसटीचे ऑनलाइन आरक्षण सुरू होणार असून १० ऑगस्टपर्यंत गाड्या कोकणात रवाना होणार असल्याची माहिती, महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

एसटी कर्मचार्‍यांना वेतन मिळणार
एसटी कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासाठी ५५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कर्मचार्‍यांचे पगार लवकर होणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांच्या पगारासाठी ५५० कोटी मंजूर झाल्याने एसटीच्या १ लाख चार हजार कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे. परंतु ५५० कोटी रूपये जरी थकबाकी वेतनासाठी मंजूर करण्यात आले असले तरी सर्व कर्मचार्‍यांचा थकीत वेतन पूर्णपणे देण्यात येईल, इतका निधी अपुरा पडण्याची शक्यता आहे.