डोंबिवलीत आश्रम परिसरात १४४ कलम लागू

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रमावर तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर आश्रम परिसरात जमावबंदीचा १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे उपचारार्थ आणि बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांमध्ये अडचण निर्माण झाली.

Dombivali
प्रातिनिधिक फोटो

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रमावर तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर आश्रम परिसरात जमावबंदीचा १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे उपचारार्थ आणि बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांमध्ये अडचण निर्माण झाली. ही जमावबंदी त्वरीत हटवावी अन्यथा भक्तगणांच्या सहनशीलतेचा बांध फुटला तर अनर्थ होईल, असा गंभीर इशारा राज्यातील भक्तगणांनी राज्य सरकारला दिला आहे, अशी माहिती डोंबिवलीतील भक्त रतन चांगो पाटील आणि प्रकाश महाराज म्हात्रे यांनी दिली. बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर येत्या ३१ ऑगस्टपर्यंत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे लाखो भक्तगण व्यथित झाले आहेत. त्यामुळे आश्रमावरील कारवाई थांबविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती डोंबिवलीतील भक्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.

पोलिसांनी दबावतंत्राचा वापर सुरू केल्याने भक्तगणांमध्ये संताप

बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्यावतीने मोफत वनऔषधी शिबीर, बाल संस्कार शिबीर, भजन, हरिपाठ, अन्नदान इत्यादी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. आश्रमावर तोडक कारवाई सुरू केल्यामुळे आश्रमाभोवती पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर वेढा पडला आहे. त्यामुळे सामान्य भक्तगणांना आश्रमात जाणे मुश्कील झाले आहे. पोलिसांनी दबावतंत्राचा वापर सुरू केल्याने भक्तगणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायलयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत भक्तगणांचा उद्रेक होईल, अशी परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आश्रमाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त केला आहे. हा बंदोबस्त हटवण्याची मागणी भक्तगण करत आहेत. तुंगारेश्वर येथील हा आश्रम कायदेशीर आहे. १९८३ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी बालयोगी आश्रमास ०.६९ गुंठे जमीन दिली होती. गेली ४८ वर्षे सदानंद महाराज यांनी समाज प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले आहे.एका पर्यावरणवाद्यााच्या हट्टासाठी लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेला आश्रमावर कारवाई करणे योग्य नसल्याची भावना भक्तगण व्यक्त करत आहेत. या आश्रमावर कारवाई केल्यास घोर अन्याय ठरेल असे डोंबिवलीतील भक्त रतन चांगो पाटील आणि प्रकाश महाराज म्हात्रे यांनी दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.