कलम ३७०, सीएए निर्णयांवर सरकार ठाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार

Mumbai
pm narendra modi in lok sabha india can no longer wait for problems to remain unsolved
पंतप्रधान नरेंद्र मोदी

काश्मीरमधील कलम ३७० आणि सीएएबाबतचा निर्णय सरकार मागे घेणार नाही. कलम ३७० आणि सीएए हे निर्णय आवश्यक होते. सरकारवर प्रचंड दबाव असतानाही हे निर्णय घेण्यात आले. यामुळे हे निर्णय कायम राहतील, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील जाहीर सभेत व्यक्त केला. देशात सध्या कलम ३७० आणि सीएएविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कलम ३७० आणि सीएएबाबत नरेंद्र मोदींनी आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

देशहिताच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे आहेत. दुनियाभरच्या सर्व दबावानंतरही आम्ही या निर्णयांवर कायम आहोत आणि भविष्यातही कायम राहू, असे मोदी यांनी सांगितले. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्यांवर महाकालच्या आशीर्वादाने निर्णय घेण्यास आपण सक्षम झालो. कलम ३७० असो की सीएए निर्णयावर मोठा दबावा येऊनही सरकारने हे निर्णय घेतले. महाकालच्या आशीर्वादाने घेतलेले हे निर्णय यापुढेही कायम राहतील याची ग्वाही देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सरकार मागे हटणार नाही, अशीच भूमिका याआधी मांडलीय.

दिल्लीतील शाहीनबागमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात मुस्लीम महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे. अनेक राज्यांनी सीएए लागू करणार नसल्याची भूमिका घेतलीय. विरोधकांनीही सीएएवरून सत्ताधारी भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसीतील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय.

लवकरच भव्य राम मंदिर                                                                                                    राम मंदिराचे प्रकरण काही दशकांपासून न्यायप्रविष्ठ होतं. आता मंदिर निर्माणाचा रस्ता मोकळा झाला आहे. सरकारने मंदिर निर्माणासाठी ट्रस्टचीही घोषणा केलीय. यामुळे लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होईल, असं मोदी म्हणाले.