आशिष शेलार बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार

ashish shelar

भाजपचे आमदार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार आता बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार आहेत. राजकारणात सध्या विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे आशिष शेलार आता बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची (BFI) डिसेंबर अखेर होणारी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन नंतर आता बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचे आशिष शेलार यांचे लक्ष्य आहे.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार आशिष शेलार यांची २०१७ साली शरद पवार यांच्या राजीनाम्या नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली होती. दरम्यान, आता क्रिकेटच्या मैदानानंतर आशिष शेलार यांना बॉक्सिंगच्या रिंगणात उतरायचे आहे. ऑलम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग खेळाचा समावेश आहे. बॉक्सिंगसाठी सकारात्मक काम करण्याची आशिष शेलार यांची इच्छा आहे. आशिष शेलार यांनी बॉक्ससिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बीएफआयचे विद्यमान अध्यक्ष अजय सिंग यांचे भाजप कनेक्शन आहे. ते स्पाईस जेट या हवाई वाहतूक कंपनीचे सहसंस्थापक आहेत. मात्र, आशिष शेलार यांनी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबद्दल अधिकृत अशी प्रतिक्रिया दिली नाही आहे.